ग्रामीण भागासाठी आता निम्मेच पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मार्च 2019

खडकवासला प्रकल्पातील पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर धरणात मिळून केवळ १०.०७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे चार टीएमसी पाणी कमी आहे.

पुणे - खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी केवळ २.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दर वर्षीनुसार उन्हाळी पिकांसाठी सुमारे पाच टीएमसीऐवजी आता निम्मेच पाणी मिळणार असल्यामुळे उन्हाळी पिकांना फटका बसणार असून, पिण्याच्या पाण्याचे संकट तीव्र होणार आहे. पुणे शहरालाही सुमारे सव्वापाच टीएमसी पाणी मिळणार असून, ते येत्या १५ जुलैपर्यंत म्हणजे साधारण साडेतीन महिने ते पुरवावे लागणार आहे.

खडकवासला प्रकल्पातील पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर धरणात मिळून केवळ १०.०७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे चार टीएमसी पाणी कमी आहे. जलसंपदा विभागाकडून १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, त्याचे काटेकोर नियोजन न झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि पिण्यासाठी केवळ २.६८ टीएमसी पाणी मिळणार आहे. 

यंदा धरणात साठा कमी असल्यामुळे उन्हाळी पिकांसाठी एक आवर्तन देण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. 
दरम्‍यान, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहरात लोकसंख्येच्या निकषानुसार साडेआठ टीएमसी पाणी देण्याचे आदेश पूर्वीच दिले आहेत.

यंदा शेतीसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्यासाठी २.६८ टीएमसी पाणी देण्यात येईल. येत्या १५ एप्रिलला उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. यंदा परतीचा पाऊस झाला नाही. शिवाय, महापालिकेकडून पाण्याचा काटकसरीने वापर केला जात नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

१५ जुलैपर्यंतचे नियोजन
उपलब्ध पाणीसाठा - १०.०७ टीएमसी                       
पुणे शहरासाठी - ५.३८ टीएमसी
उन्हाळी आवर्तन (शेती आणि पिण्यासाठी) - २.६८ टीएमसी
बाष्पीभवन - १.२५

Web Title: Rural Area Water Supply 50 percentage decrease