नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांत झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पिंपरी - बॅंकेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी गुरुवार (ता.10) पासून सुरवात झाली. चलनातून बाद झालेल्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच बॅंकेबाहेर रांगा लावून गर्दी केली. मात्र, काही बॅंकांकडे बदली करून देण्यासाठी नोटाच शिल्लक नसल्याने ग्राहक व बॅंका यांची पंचाईत झाली. 

पिंपरी - बॅंकेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी गुरुवार (ता.10) पासून सुरवात झाली. चलनातून बाद झालेल्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच बॅंकेबाहेर रांगा लावून गर्दी केली. मात्र, काही बॅंकांकडे बदली करून देण्यासाठी नोटाच शिल्लक नसल्याने ग्राहक व बॅंका यांची पंचाईत झाली. 

गुरुवारपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची घोषणा सरकारने केली होती. यामुळे ग्राहकांनी सकाळी सातपासूनच बॅंकेबाहेर रांग लावली होती. सकाळी दहा वाजता बॅंक उघडण्यापूर्वीच दीडशे-दोनशे जण रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. बॅंकेचा व्यवहार एक तास अगोदर सुरू होणार असे सरकारने घोषित केले होते. मात्र, बॅंकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत याबाबतची सूचना गेली नसल्याने ते नेहमीच्या वेळी सकाळी दहा वाजता आले. 

नोटा बदलण्यासाठी फार्म 
ज्यांना बॅंकेकडून नोटा बदलून घ्यायच्या आहेत, अशांना एक फॉर्म भरून देण्यास सांगितले होते. त्या फॉर्मसोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना याची झेरॉक्‍स देणे बंधनकारक केले होते. मात्र, ज्यांना केवळ बॅंकेत पाचशे किंवा हजार रुपयांच्या नोटांचा भरणा करायचा होता. त्यांना मात्र अर्जाबाबत सक्‍ती नव्हती. त्यांनी नेहमीच्या पद्धतीने स्लिप भरून देण्यास सांगण्यात आले होते. 

बॅंकांकडे नोटाच उपलब्ध नाहीत 
बॅंकेचे काम नेहमीप्रमाणे सुरू झाले. मात्र, काही बॅंकांत बदली करून देण्यासाठी नोटा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे ते खातेदार आहेत, त्यांनी पाचशे-हजार रुपयांच्या नोटांचा बॅंकेत पैशाचा भरणा केल्यावर धनादेशाच्या माध्यमातून त्यांना पैसे देण्याचे काम सुरू होते. दुपारपर्यंत काही बॅंकेत रोकड आल्यावर याबाबतच्या तक्रारी दूर झाल्या. 

नवीन नोटांबाबत आग्रह 
नोटा बदलून घेताना अनेक बॅंकांकडून शंभर किंवा चलनातील इतर नोटा दिल्या जात होत्या. मात्र, अनेक ग्राहकांनी चलनात नवीन आलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांची मागणी होत होती. काही ठिकाणी नवीन नोटा आल्या नसल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. 

खासगी बॅंकेकडून चांगली सेवा 
राष्ट्रीयीकृत बॅंकांऐवजी खासगी बॅंकेकडून खातेदारांना चांगली सेवा देण्यात येत असल्याचे दिसून आले. काही बॅंकांनी ग्राहकांना गुरुवारपासून बॅंका पूर्ववत सुरू राहणार असल्याचा "एसएमएस' पाठविला होता. खासगी बॅंकांनी ग्राहकांचे कोणते काम आहे, त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग नेमला होता. तसेच ज्येष्ठांना रांगेत उभे न करता त्यांचा नंबर अबाधित ठेवून त्यांना बसण्याची सुविधा दिली होती. 

नोटा बदलून घेण्यासाठी किंवा बॅंकेत पैशाचा भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत अडीच ते तीन तास थांबावे लागत होते. नोटा बदलून देण्यासाठी बॅंकेने वेगळा काउंटर उघडावा, अशी मागणी ग्राहकांनी केली. मात्र, ते शक्‍य नसल्याचे बॅंकेकडून स्पष्ट झाले. 

बॅंकेत पोलिस बंदोबस्तही 
अनेक दुकानदार व व्यावसायिक आपल्याकडे जमा झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकेत आले होते. यात वृद्धांचाही समावेश होता. चोरीचे प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. इतर ठिकाणी सुरक्षारक्षकाने कोणती काळजी घ्यावी, या बाबत त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. 

झेरॉक्‍सच्या दुकानांत गर्दी 
नोटा बदलून घेताना त्यासोबत पुरावा देण्यासाठी ओळखपत्राची झेरॉक्‍स आवश्‍यक होती. यामुळे झेरॉक्‍स काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, त्याही ठिकाणी सुट्ट्या पैशांवरून बाचाबाची होताना दिसत होती. 

एटीएम मशिन बंदच 
गुरुवारपासून बॅंका सुरू झाल्या असल्या तरी शहरातील बहुतांश एटीएम मशिनमधून पैसे काढता येत नव्हते. काही बॅंकांनी गुरुवारी एटीएममधून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्या. मात्र, त्याजागी नवीन नोटांचा भरणा केलाच नव्हता. यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.

Web Title: rush to exchange currency notes