विद्येच्या माहेरघरातच विद्यार्थ्यांवर अन्याय; फी न भरल्याने शाळेने विद्यार्थ्यांना केले 'ब्लॉक'!

Ryan_International_School
Ryan_International_School

पुणे : पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या बावधन येथील रायन इंटरनॅशनल स्कूलने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना चक्क ऑनलाईन वर्गात 'ब्लॉक' केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बावधन येथील 'आयसीएसई'च्या रायन इंटरनॅशनल स्कूलमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र तरीही शाळेकडून दरवर्षीप्रमाणे नियमित शुल्क देण्याची सूचना पालकांना करण्यात आली. या शुल्कमध्ये शैक्षणिक शुल्कासह कॉम्प्यूटर लॅब, प्रयोगशाळा, स्विमिंग, स्केटिंग असे शुल्कही आकारण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाला याबाबत सातत्याने विचारणा केली. मात्र, शाळा प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. 

शुल्काबाबत पालकांकडून वारंवार पाठपुरावा होत असतानाही शाळेने पालकांना उत्तर दिले नाही. त्याउलट कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून ब्लॉक करण्यात आले. त्यामुळे शाळा प्रशासनाची भेट घेण्यासाठी पालक गुरूवारी (ता.६) शाळेत जमले होते. याबाबत पालकांनी एकत्रित येऊन सरकारचे दरवाजे ठोठाविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात पालकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेतली.

पालकांच्या अडचणींबाबत संवेदनशील : शाळा प्रशासन
"सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन शाळा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्याशिवाय कोरोनामुळे निर्माण झालेल्या पालकांच्या आर्थिक अडचणींबाबत शाळा संवेदनशील आहे. शाळेमार्फत सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी शाळेला पायाभूत सुविधा उभाराव्या लागल्या आहेत. त्याशिवाय शाळा बंद असली तरीही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, आवश्यक उपकरणांचा खर्च, दुरुस्ती देखभाल खर्च हे शाळेला करावेच लागत आहेत. पालकांच्या अडचणी समजून घेऊन आम्ही शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्याची मुभा दिली आहे," असे रायन इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com