गेलो आम्ही रिसेप्शनला पण पोचलो डोहाळजेवणाला

S L Khuthwad Writes About woman's Nature
S L Khuthwad Writes About woman's Nature

आज सायंकाळी मित्राच्या रिसेप्शनला जायचं ठरलं होतं. त्यामुळं बायकोला आधीच तयार राहायला सांगितलं होतं. मी आलो की लगेच निघू, असा तीन वेळा निरोपही दिला होता. पण कसलं काय? मी घरी गेलो तेव्हा तिनं साड्यांचा ढीग लावला होता. मला पाहिल्यानंतर "अहो, यातील कोणती साडी मला शोभून दिसेल,'' असा प्रश्न विचारला.

ढिगाऱ्यातील एका साडीवर आम्ही बोट ठेवलं. ‘‘अहो, ही साडी गेल्या वर्षी मावशीची मुलगी सोनमच्या लग्नात नेसले होते. तीच आता कशी रिपीट करायची’’? मग आम्ही दुसऱ्या साडीवर बोट ठेवले. ‘‘अहो, असं काय करता? पाडव्याला तर या साडीची मी घडी मोडली आहे. सहा महिन्यांतच ती पुन्हा कशी नेसायची? लोकं मला हसतील ना?’’

त्यानंतर आम्ही आमचे बोट उचलून आणखी एका साडीवर ठेवले. ‘‘छे ! तुम्हाला तर काही स्मरणशक्तीच नाही. महिलामंडळाच्या भिशीच्या कार्यक्रमात ती मी नेसले नव्हते का?’’ असे तिने म्हटले.

‘‘बघितलंत ! मला चांगल्या साड्याच नाहीत. आता तुमच्या या पगाराला चांगल्या पाच- सहा साड्या घेऊन ठेवते.’’ या तिच्या वाक्यावर आमच्या पोटात गोळा आला. पण तसे न दाखवता आम्ही दुसऱ्या एका साडीवर बोट ठेवले. बराचवेळ आम्ही बोट नाचवत होतो. पण काही उपयोग होत नव्हता. खरं तर नवऱ्याचं बोट हे केवळ नाचण्यापुरतंच असतं. पण बायकोच्या बोटात नवऱ्याला नाचवण्याची ताकद असते, याची आम्हाला खात्री पटली. थोड्यावेळाने कंटाळा येऊ लागल्याने आम्ही जांभया देऊ लागलो मग आम्ही बेडरूममध्ये जाऊन झोपलो. तासाभराने उठून आलो तरी बायको अजून साड्यांच्या गराड्यातच होती. ‘‘अहो, ही मोरपंखी साडी कशी दिसेल’’? असा प्रश्‍न तिने विचारला. दोन मिनिटांत आम्ही तयार झालो होतो आणि तीन तासांत कोणती साडी नेसायची, हे तिचं ठरत नव्हतं. त्यामुळे आम्ही वैतागलो होतो.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

"नेस गं कोणतीही. कोण बघतंय एवढं ! अंगाला काहीतरी गुंडाळायचं आणि निघायचं.'' असं आम्ही सहज म्हटलं. त्यावर तिनं असा काही आकांडतांडव केला की बोलायची सोय नाही. त्यानंतर पुढील अर्धा तास आमचा फक्त माफी मागण्यातच गेला. शेवटी एकदाची साडी ठरली. त्यानंतर मेकअपसाठी अर्धा तास घालविल्यानंतर ती एकदाची तयार झाली. त्यानंतर मॅचिंग मास्क घालून, ती आमच्याबरोबर निघाली.


एवढा मेकअप करून, शेवटी तोंडावर मास्क लावून बाहेर पडायचं, यापेक्षा दुसरं दुदैव नाही, हे आम्ही मनातल्या मनात म्हटलं. रिसेप्शनला गेल्यानंतरही तिचे साडीपुराण सुरूच होतं. ‘‘हिची साडी बघा. अजिबात तिला शोभत नाही.’ ‘किती भडक रंग आहे’ असं एका साडीकडे बघत तिनं नाक मुरडलं. तिच्या ओळखीच्या महिलेसोबत ती गप्पा मारू लागली. अर्थात विषय साडीचाच. ‘‘माझ्याकडे तुमच्यासारखीच डिट्टो साडी होती. दोन वेळा नेसल्यानंतर मी मोलकरणीला दिली.’’ असं तिनं सांगितलं. ती गप्पात रमलेली पाहून मी एकट्यानेच नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. घरी जाण्यासाठी आम्ही निघालो.

‘‘डोहाळजेवणाचा कार्यक्रम मस्त झाला बरं का? जेवणही उत्तम होतं. पण तेथील काही बायकांना साड्यांचा सेन्स अजिबात नव्हता बरं का?’’ तिचं हे वाक्य ऐकून आम्ही चेहऱ्यावर मास्क लावला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com