#SaathChal पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुक्काम, विसावा आणि पालखी मार्गावर आवश्‍यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. 

पिंपरी (पुणे) : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुक्काम, विसावा आणि पालखी मार्गावर आवश्‍यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. 
शहरामध्ये शुक्रवारी (ता.6) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होईल. तर, शनिवारी (ता.7) संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी येणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेतर्फे आवश्‍यक व्यवस्था करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज पालखीसमवेत येणाऱ्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आकुर्डी आणि निगडी परिसरातील 36 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये व्यवस्था असणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्‍या स्वच्छ केल्या आहेत. महापालिकेतर्फे निगडी येथील भक्ती-शक्ती चौक आणि दिघी मॅगझीन चौक येथे प्रत्येकी 1 नियंत्रण कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आकुर्डीतील मुक्कामाच्या ठिकाणी व दोन नियंत्रण कक्षाच्या येथे सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. देहू ते पंढरपूरपर्यंत महापालिकेचे अग्निशामक वाहन असणार आहे. 

भक्ती-शक्ती चौक (निगडी) ते दापोडी व आळंदी-बोपखेल या दोन्ही पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालखी मार्गात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी केली जात आहे. पालखी मार्गावरील मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. पालखी सोहळा कालावधीत पालखी मार्ग, विसाव्याच्या ठिकाणाजवळील कत्तलखाने बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय 
महापालिकेचा दोन्ही पालख्यांसोबत पंढरपूरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रत्येकी 1 टॅंकर असणार आहे. निगडी आणि दिघी मॅगझीन चौक येथील पालखी स्वागताच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची सोय असेल. त्याशिवाय, आकुर्डी येथे पालखी मुक्काम, खराळवाडी व दापोडी येथील विसाव्याचे ठिकाण आणि पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची सोय असणार आहे. 

आरोग्य-वैद्यकीय सुविधा 
आकुर्डीतील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी 24 तास मोफत वैद्यकीय सुविधा दिली जाईल. त्याशिवाय, पालखीसोबत देखील वैद्यकीय पथक असेल. पालखी मार्ग आणि आकुर्डीतील मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता केली जाईल. जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाचे 80 कर्मचारी तैनात असतील. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी भाडेतत्त्वाने 390 पोर्टेबल स्वच्छतागृह घेतले आहेत. आकुर्डीतील मुक्काम, खराळवाडी आणि दापोडी येथील विसावा, यमुनानगर परिसर आदी ठिकाणी हे पोर्टेबल स्वच्छतागृह असतील. त्याशिवाय, आकुर्डी परिसरातील शाळा व सार्वजनिक स्वच्छतागृह अशी मिळून 550 स्वच्छतागृहांची वेगळी सोय आहे. 

"शहरात पालख्यांसमवेत येणाऱ्या वारकऱ्यांना विविध स्वयंसेवी संस्थांकडून देण्यात येणारे अन्नपदार्थ स्वच्छ व ताजे असावे. अन्नदानानंतर परिसरात होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावावी. प्लॅस्टिकचा वापर टाळावा. नागरिकांनी उघड्यावर शौचाला न जाता स्वच्छतागृहांचा वापर करावा. निर्मल वारी करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक काळजी घ्यावी.'' 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त 

Web Title: saath chal municipal corporation ready to welcome palakhi