#SaathChal पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. महसूल, पोलिस, वैद्यकीय, महावितरण, अन्न व औषधी प्रशासन यांसह विविध विभागांतील साडेसात हजार अधिकारी- कर्मचारी त्यासाठी कार्यरत आहेत. पालखी दिंड्यांतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास समन्वय कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी दिली. 

पालखीमार्गावरील सर्व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान या मार्गावरील कत्तलखाने, मांसाहारी हॉटेल आणि मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पालखीमार्गावरील भारनियमन रद्द करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर, आपत्कालीन यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान शहराच्या वाहतुकीत बदल करण्यात येतील. त्याबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे राम यांनी सांगितले. 

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका महाराज या प्रमुख तीन पालखीमार्गांवर मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात सर्व विभागांतील अधिकारी- कर्मचारी असतील. पालखीमार्गावरील मुक्कामी दिंड्यांना गॅस, केरोसिनचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने दिंड्यांना पासेस दिले आहेत. पालखी सोहळ्यात निर्मलवारी अभियान राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच भूसंपादन 
पालखीमार्गाच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच भूसंपादन करण्यात येणार आहे. तेथील जमिनीची मोजणी सुरू केली असून, ते काम जुलैअखेर संपेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम जवळपास 90 टक्‍के पूर्ण झाले आहे. केवळ हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि भोर तालुक्‍यातील काम अपूर्ण आहे. तसेच, जिल्ह्यात येत्या 14 आणि 28 जुलै रोजी मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. 

Web Title: #SaathChal administration is ready for the Palkhi ceremony