#saathchal पालखी मार्गावर अतिक्रमणांना प्रतिबंध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पुणे - पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गासह आजूबाजूच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. आता या मार्गावर बेकायदा दुकाने उभारल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होणार आहे. विशेषत: फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यांसह पेठांमध्ये अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. 

महापालिकेने अतिक्रमणे रोखण्यासाठी अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांची भरारी पथके नेमली आहेत. पुढील चार दिवस अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू राहील. शहरात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे आगमन उद्या (ता. ८) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या असून, पालखी मार्गावरील तात्पुरती आणि कायमस्वरूपी अतिक्रमणे हटविली आहेत. 

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत असली, तरी हातगाड्या, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी रस्ते पुन्हा व्यापले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा अतिक्रमण विभागाचा प्रयत्न आहे. काही भागांत खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जातात. त्यामुळे बेकायदा दुकाने उभारणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिल्या आहेत. 

सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली आहेत. ही कारवाई नियमित सुरू राहील. कारवाईनंतरही स्टॉल दिसून आल्यास संबंधित व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.  
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग

Web Title: #saathchal The ban on encroachments on the Palkhi road