#SaathChal तुकाराम महाराज, मोरया गोसावी पालखीची भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पिंपरी - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच चिंचवडमार्गे जात असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये वेगळाच उत्साह पाहण्यास मिळाला. 

पिंपरी - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच चिंचवडमार्गे जात असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये वेगळाच उत्साह पाहण्यास मिळाला. 

संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरीगाव येथील भैरवनाथ मंदिरात मंगळवारी रात्री मुक्कामाला होती. सकाळी साडेसातच्या सुमारास पिंपरीगाव येथून पालखी देहूसाठी मार्गस्थ झाली. पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्याने ती सकाळी आठच्या सुमारास चिंचवडगाव येथील मुख्य बस स्थानकाजवळ उभारलेल्या मंडपात पोचली. मंगलमूर्ती वाड्यातून महासाधू मोरया गोसावी यांच्या मूर्तीसह निघालेला पालखी रथ संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रतिकात्मक भेटीसाठी आणली गेली. भाविकांनी येथे दर्शनासाठी एकच गर्दी केली. श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि चिंचवडगाव ग्रामस्थ यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे जोरदार स्वागत केले.

जयघोष करीत निघालेले वारकरी येथे तासभर थांबले. उपमहापौर सचिन चिंचवडे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, सोहळाप्रमुख सुनील महाराज मोरे व चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार महाराज देव, विश्राम देव, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे उपस्थित होते. चिंचवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, माटे शाळा, श्री फत्तेचंद जैन विद्यालय, महापालिकेची मराठी शाळा (केशवनगर), चापेकर विद्यालय आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजता येथून निघालेली पालखी चापेकर चौकमार्गे दळवीनगरमार्गे सकाळी दहा वाजता आकुर्डीला पोचली. 

पालखी सोहळा देहूत विसावला
देहू - तब्बल ३४ दिवसांच्या प्रवासानंतर तुकोबा तुकोबा नामाचा जयघोष आणि टाळमृदंगाच्या निनादात संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. ८) दुपारी तीन वाजता देहूत आगमन झाले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

बुधवारी सकाळी चिंचवडगावातून सोहळा निगडीकडे मार्गस्थ झाला. चिंचोली येथील शनी मंदिरात दुपारी साडेबारा वाजता पालखीचे आगमन झाले. त्यानंतर देहूतील अनगडशावली बाबा मंदिराजवळ आली. या ठिकाणी अभंग आरती झाली. गावातील तुपे कुटुंबाकडून परंपरेनुसार प्रवेशद्वाराजवळ दहीभाताचा नैवेद्य दाखवला. सोहळ्यात सहभागी झालेल्या विणेकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: #SaathChal Palkhi Wari Sant Tukarama Maharaj Morya Gosavi