#SaathChal पावणेदोन कोटी खर्चून रस्ते

saathchal-wari2018
saathchal-wari2018

आळंदी - आषाढी वारीसाठी आळंदी (ता. खेड) नगरपालिकेने प्रदक्षिणा रस्ता आणि जिल्हा नगरोत्थानच्या सुमारे पावणेदोन कोटी रुपये निधीतून मंदिराकडे येणारे रस्ते क्राँक्रीटचे केले आहेत. राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून हे कामे. डेंगीचा उपद्रव वारीत होऊ नये यासाठी शहरात डासप्रतिबंधक फवारणी सुरू केल्याची माहिती आळंदीच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली.

आळंदीत आषाढी वारीतील पालखी प्रस्थान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. वारीकाळात येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आळंदी पालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष उमरगेकर यांनी सविस्तर माहती दिली. रस्ता सिमेंटीकरणाचे काम आता ८० टक्के पूर्ण झाले आहे. रस्त्यावरील धूळही काढली जात आहे. यामुळे यंदाची वारी खड्डेमुक्त राहील. वारकऱ्यांना चोवीस तास पाणी आणि आरोग्यसुविधा पुरविण्यात येणार आहेत. आळंदी गेली काही महिने डेंगीचा उपद्रव होता. आता पालिका सध्या डेंगीच्या डासांचा उपद्रव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात शहरात धुरळणी यंत्राद्वारे फवारणी करत आहे. उद्या मंगळवारपासून शहरातील रस्त्यांवर जंतुनाशक फवारणी केली जाईल. दोन दिवसांत वारीसाठी जादाचे कर्मचारी लावून शहर स्वच्छता ठेवली जाईल. वारीकाळात रात्री आणि पहाटेच्या वेळी घंटागाड्यांची सोय कचरा वाहण्यासाठी केली आहे. वारकऱ्यांना पंधरा टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून, शहराबाहेरील दिंड्यांसाठी ही सोय आहे. इंद्रायणीला सध्या मुबलक पाणी आहे. वारीकाळासाठी नदीकाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिगरूमची व्यवस्था करण्यात येईल. शहरात ठिकठिकाणी पाचशे प्रखर प्रकाशझोताची व्यवस्था केली जाणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून चौदा ठिकाणी बांधण्यात आलेल्या साडेतीनशे शौचालये आणि जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे पाचशे शौचालये विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. शौचालयाची ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था केली जाईल. शौचालयांची तुटलेली दारे, नळ, वीजजोडची दुरुस्ती केली आहे.

शहरातील बहुतांश अतिक्रमणे काढल्याचा दावा पालिकेचे बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड करत आहे. प्रदक्षिणा रस्ता, चाकण चौक आणि महाद्वार परिसरातील अतिक्रमणे काढली आहेत; तर काही अतिक्रमणे दुकानदार स्वतःहून काढत आहेत. ४ जुलैपर्यंत सर्व अतिक्रमणे काढण्यात येतील.

पालिकेत मध्यवर्ती आपत्तीकालीन कक्ष
वारीत सोयीसुविधा पुरविण्यात अडचण येऊ नये यासाठी शहरात विविध ठिकाणी यात्रा अनुदानातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. याशिवाय प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेत मध्यवर्ती आपत्तीकालीन कक्ष उभारण्यात येईल. शहरातील सर्व शासकीय कार्यालयांतील एक प्रतिनिधी उपस्थित राहील. मंदिरात जाणाऱ्या व्हीआयपी व्यक्तींच्या सोयीसाठी पालिकेत कक्ष स्थापन केला जाईल, असे नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com