#SaathChal आई-वडिलांवरील प्रेमाची वारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी ‘साथ चल’ उपक्रमाचा पुढचा टप्पा सोमवारी पार पडला. ‘सकाळ’ने ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. पुलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानक ते हडपसरमधील गाडीतळदरम्यान विविध क्षेत्रांतील नागरिक यात सहभागी झाले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना... 

आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी ‘साथ चल’ उपक्रमाचा पुढचा टप्पा सोमवारी पार पडला. ‘सकाळ’ने ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. पुलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानक ते हडपसरमधील गाडीतळदरम्यान विविध क्षेत्रांतील नागरिक यात सहभागी झाले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना... 

मुक्ता टिळक (महापौर) - ‘सकाळ’माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी वारकऱ्यांसमवेत दोन पावले चालण्याचा ‘साथ चल’ हा उपक्रम अनुकरणीय आहे. धावपळीच्या जीवनात कुटुंबाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजाचे स्वास्थ्य राखण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरेल.

बिशप थॉमस डाबरे - समाजातल्या सगळ्यांनी आपापसातले जाती, धर्म, पंथांचे भेद विसरून एकत्र चालण्याचा सोहळा म्हणजे ही पंढरीची वारी. एक मराठी माणूस आणि ख्रिश्‍चन धर्मीय म्हणून मला या परंपरेचा अनुभव आहे. वारकरी भक्ती परंपरा महाराष्ट्राचे वैभव आहे. साथ चल या उपक्रमातून आई-वडिलांसाठी वारीत चालत असताना समाजाच्या प्रगतीसाठीही सगळ्यांनी एकोप्याने चालत राहिले पाहिजे.

विजू खोटे (ज्येष्ठ अभिनेते) - आई-वडिलांसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून वारीत चालल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये कृतज्ञतेची भावना वाढेल. आजची सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बघता हे खूप गरजेचे आहे. 

महेश टिळेकर (दिग्दर्शक) - ग्लॅमर बाजूला ठेवून वारीत समरस झालो. त्यावेळी सामान्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नवी ऊर्जा मिळाली. तरुणांनी आई-वडिलांचा सांभाळ केल्यास वृद्धाश्रमांची गरज भासणार नाही.

भार्गवी चिरमुले (अभिनेत्री) - विठ्ठलाला आपण माउली म्हणतो. साथ चल या उपक्रमात आई-वडिलांसाठी चालण्याची संकल्पना फार छान वाटली. संपूर्ण वारीसाठी प्रत्येकाला जाणे शक्‍य नसते; पण या उपक्रमामुळे वारीत चालल्याचा अनुभव मिळाला. 

तेजा देवकर (अभिनेत्री) - अनेक घरांमध्ये वृद्ध आई-बाबा एकटे असतात, हे बघून फार अस्वस्थ वाटते. या उपक्रमामुळे हे चित्र बदलायला थोडीशी मदत होईल, अशी आशा आहे. 

स्मिता शेवाळे (अभिनेत्री) - आई-वडिलांबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा सामाजिक संदेश वारीच्या निमित्ताने सकाळने पोहोचवला. हे पाहून फार छान वाटलं. 

प्राचार्या कल्पना मुळगावकर - साथ चल उपक्रम लवकर चालू व्हायला हवा होता. विद्यार्थ्यांना ज्याची गरज होती ते सकाळने मुलांना दिले आहे. त्याचा आनंद आहे.

पूजा मानघाले (विद्यार्थिनी) - आज इथे खूप वारकऱ्यांना बघून मन प्रसन्न झालं. वारीच्या निमित्ताने आपण आई-वडिलांना आयुष्यभर सांभाळलं पाहिजे, ही शिकवण ‘साथ चल’ या उपक्रमातून मला मिळाली. 

सबीना तांबोळी (विद्यार्थिनी) - आजवर आम्ही वारीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आपला सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी मिळालेली ही महत्त्वाची संधी आहे. 

सोहन चौधरी (विद्यार्थी) - आई-वडिलांवरचे प्रेम बोलून नाही तर कृतीतून दाखवायला पाहिजे. तो प्रयत्न मी येथे येऊन केला आहे. या उपक्रमाद्वारे मला तो प्रत्यक्षात आणता आला याचा आनंद.

सुमन नसकर (विद्यार्थिनी) - आई-वडिलांचे मोल मला या उपक्रमाद्वारे कळले. तुकारामांनी पांडुरंगाला आई-वडील मानले तसे मी माझ्या आई-वडिलांना मानण्याचा प्रयत्न करेल.   

मजीद सय्यद (विद्यार्थी) - आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. याची आज गरज होती. वृद्धाश्रमांची संख्या अशा उपक्रमांमधून कमी व्हायला मदत होईल. 

स्वप्नील दौंडे (विद्यार्थी) - आजची गरज आणि तंत्रज्ञानाचा वापर बघता त्याचा परिणाम तरुणांवर होतो आहे. तरुणांना आपल्या आई-वडिलांची जाणीव करून देण्याची गरज होती. सकाळने ती पूर्ण केली आहे. 

साईराज सणरम (विद्यार्थी) - आई-वडिलांवर माझं खूप प्रेम आहे. त्यांना मान देण्याचा एक प्रयत्न यातून मी करतो आहे. त्याचं मोल काय असते ते आज या उपक्रमाद्वारे अनुभवतो आहे.   

हर्षनंदन घोडगे (विद्यार्थी) - ‘साथ चल’ हा उपक्रम आई-वडिलांच्या सेवेसाठी युवा पिढीला जागृत करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या उपक्रमामार्फत समाजाची मानसिकता बदलण्यास साहाय्य होईल. मी आई-वडिलांच्या संगोपनाची या वेळी शपथ घेतली असून, ती आयुष्यभर पाळणार आहे.

रूपाली जाधव (विद्यार्थिनी) - वारीमधून आई-वडिलांची सेवा कशी करावी हे समजले. त्यांना आपण वृद्ध आश्रमात टाकू नये, तसेच त्यांना दूर करू नये. असा संदेश मला मिळाला. 

ईशांत वाघ (विद्यार्थी) - माझ्या आई-वडिलांनी मला लहानाचं मोठं केले. त्यांच्यासाठी चालणं काही वेगळाच आनंद देतो आहे. आम्हा मुलांकरिता असे उपक्रम सकाळने यापुढेही घ्यावेत.
 

शैला पाटील - डिजिटल जगात दिवसेंदिवस हरवत चाललेल्या आजच्या पिढीला आई-वडिलांचं आणि आपल्या संस्कृतीचं महत्त्व सांगणारा हा उपक्रम आहे. 

लतिफ मगदूम - आझम कॅम्पसमधल्या विविध व विभागांचे विद्यार्थी ‘साथ चल’ या उपक्रमात सहभागी झालेत. आई-वडिलांचा सांभाळ करण्यासोबतच ज्ञानोबा-तुकोबांची शिकवण आमच्या विद्यार्थ्यांना इथे मिळतेय.  

पुरुषोत्तम नांगरे - सोशल मीडियावर मदर्स डे - फादर्स डेनिमित्ताने अनेक ट्रेंड सुरू होतात. त्यातून आई-वडिलांबद्दल व्यक्त केलेलं प्रेम क्षणिक असतं. प्रत्येकाने नेहमीच आई-वडिलांबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. आज पुणे शहरातल्या जनतेने मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन या विषयाचे महत्त्व अधोरेखित केलं आहे. 

बलबीरसिंग होरा - वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत. ‘सकाळ’चा हा उपक्रम या गोष्टी थांबवाव्यात, यासाठी एक उत्तम पाऊल आहे. 

जसपालसिंग आनंद - सकाळ आणि पालखीमुळे आई-वडिलांची सेवा करण्याचे महत्त्व लोकांना समजले. त्याची अंमलबजावणी दैनंदिन जीवनात करणे गरजेचे आहे. त्यातून या उपक्रमाचा उद्देश साध्य होईल.

नीलम अहीर - ‘साथ चल’सारख्या उपक्रमांमधून मुलांना आपले संस्कार कळतील. त्याची जाणीव त्यांना असेल आणि ते अमलात आणण्याचा प्रयत्न करतील.

यास्मीन पटाईत - अशा उपक्रमाद्वारे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. असे उपक्रम लोकांना परस्परांच्या जवळ आणतात. 

राजेश भुसारी - मुलांमध्ये आई-वडिलांची जागृकता निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी हा उपक्रम थोडा वेगळा वाटतो. 

विठ्ठल काटे (अध्यक्ष, नवचैतन्य हास्य क्‍लब परिवार) - ‘साथ चल’सारखे उपक्रम आवश्‍यक असतात. आई-वडिलांना वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही हा उद्देश चांगला आहे. तरुणांना याची सकाळने जाणीव करून दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. 

सविस्तर प्रतिक्रिया आणि व्हिडिओ पाहा www.esakal.com वर 

Web Title: #SaathChal Wari Palkhi Mother Father Leader Actress