#SaathChal आई-वडील, सासू-सासऱ्यांच्या अखंड सेवेचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - ‘विठु माउली तू माउली जगाची...’ असा जयघोष करीत पंढरपूरच्या पांडुरंगाप्रमाणेच आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ हजारो महिलांनी सोमवारी घेतली. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमात आई-वडील आणि सासू-सासऱ्यांची सेवा करण्याचा संकल्प महिलांनी केला. शहरातील हजारो महिलांनी या उपक्रमात पूलगेट ते हडपसरपर्यंत जवळपास सहा किलोमीटर पायी प्रवास केला. वरुणराजाने दमदार हजेरी लावली तरीदेखील क्षणाक्षणाला महिलांचा उत्साह वाढत होता. शहरातील काही महिलांनी वारकऱ्यांसमवेत सासवडपर्यंत प्रवास करण्याचा मानस व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातून दिंडीसमवेत चालत देहूगावला आलो आणि आता पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत. आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागल्याने पावले आपोआप दिवसरात्र त्या दिशेने चालत राहतात. आई-वडिलांचा वारीचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत.
- जनूबाई ढोणे

गेल्या तीन वर्षांपासून वारकऱ्यांसमवेत पुणे ते हडपसर असा प्रवास करत आहे. यंदा ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वारीत सहभागी झालो आहोत. आई-वडिलांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे.
- अर्चना शहा

‘साथ चल’ उपक्रमानिमित्त वारीत सहभागी होता आल्याचा आनंद आहे. ‘सकाळ’च्या या उपक्रमामुळेच मी पहिल्यांदा वारीत सहभागी झाले. आई-वडिलांच्या सेवेसाठीचा हा उपक्रम तरुणांना प्रोत्साहन देणारा आहे.
- प्राची कुदळे

वयाची साठी ओलांडली, तरीही पायी वारीचा उत्साह अजूनही टिकून आहे. जालन्याहून दिंडीत सहभागासाठी आलो आहे. गेल्या १६ वर्षांपासून वारीत सहभागी होत आहे. आई-वडिलांची सेवा हीच विठुरायाची सेवा आहे, असे आम्ही मानतो.
- पार्वतीबाई पवार

Web Title: #SaathChal Wari Palkhi Mother Father Service