#SaathChal पुंडलिकांची मांदियाळी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवले. त्यांच्या बरोबरीने पावले टाकत अनेक पुणेकरांनी हडपसरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी आई-वडिलांची जपणूक आणि त्यांची नियमित सेवा करण्याचा संकल्प केला.  

पुलगेट येथे सोमवारी पहाटेपासून ‘माउली-माउली’चा जयघोष सुरू झाला. अत्तर आणि गुलाबपुष्पांचा सुगंध, टाळ-मृदंगाचा गजर, अशा भक्तिमय वातावरण पुलगेट पीएमपी स्थानकातून पुणेकरांनी ‘साथ चल’ उपक्रमातून वारीची वाट धरली. जन्मदात्यांना आयुष्यभर सांभाळण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे आयोजित उपक्रमात असंख्य नागरिक सहभागी झाले होते. 

महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कुटुंब रक्षणाची शपथ घेण्यात आली. जन्मदात्यांप्रती लीन होण्याच्या या उपक्रमात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी झाले होते. पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या, तरीही आपल्या आई-वडिलांसाठी वारीत चालण्यास लोक मोठ्या संख्येने महात्मा गांधी बस स्थानकाच्या परिसरात येत होते. तारे-तारकांबरोबरच लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या धर्मांतील प्रतिनिधींनी पुंडलिकाप्रमाणे आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेतली. या वेळी वातावरण भावुक झाले होते. 

विद्यार्थ्यांमुळे चैतन्य
भैरोबा मंदिर येथील शिवरकर महाविद्यालयात वानवडीतील ह. ब. गिरमे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चैतन्य आणले. शपथ घेतल्यानंतर वारकऱ्यांबरोबर फुगड्या खेळण्याचा आनंद या मुला-मुलींनी घेतला.

शिक्षकांनाही त्याचा मोह आवरता आला नाही. वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळल्यानंतर अनेकांचे हात अलगद त्यांच्या दर्शनासाठी पुढे होत होते. त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांसोबत हे विद्यार्थी हडपसर येथील लोहिया उद्यानाच्या दिशेने मार्गस्थ झाले. रस्त्यात, ‘वारी विठ्ठलाची, आई वडिलांना सांभाळण्याची’ या वाक्‍याचे फलक त्यांनी हाती घेतले होते.

वातावरण भक्तिमय
राममनोहर लोहिया उद्यानात जमलेले विद्यार्थी आणि नागरिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये ‘साथ चल’ या ‘वारी’चा उत्साह दिसून आला. शपथ घेतल्यानंतर सर्व उपस्थित नागरिक शिस्तबद्ध पद्धतीने वारीत सहभागी झाले. सोबत टाळ-मृदंगाचा नाद वातावरण भक्तिमय करीत होता. लोहिया उद्यान येथून गाडीतळ येथे पोचल्यानंतर वारीची सांगता झाली. ज्येष्ठ नागरिकांची समस्या आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढू नये, असा निर्धार या वेळी करण्यात आला.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Mother father service oath