#SaathChal पावसाच्या सरी अन्‌ हरिनामाचा गजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले.

मांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सकाळी साडेनऊच्या सुमारास गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे सव्वा तास विसाव्यावर माउलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. त्यानंतर पालखीने पावणे अकराच्या सुमारास सासवड मुक्कामी प्रस्थान ठेवले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी बाराच्या सुमारास गाडीतळ विसाव्यावर दाखल झाली. त्या वेळी वरुणराजाने हजेरी लावत जलाभिषेक घातला.

दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पालखीने लोणी काळभोर मुक्कामी प्रस्थान केले. भैरोबानाला येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, शिवाजीराव केदारी यांनी पालखीचे स्वागत करून भाविकांना फराळाचे वाटप केले.

गाडीतळ पालखी विसाव्यावर महापौर मुक्ता टिळक, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, हेमलता मगर, मारुती तुपे, योगेश ससाणे, वैशाली बनकर, पूजा कोद्रे आदींनी पालखीचे स्वागत केले.

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने अवयवदान जनजागृती व मुलगी वाचवा अभियान रॅलीचे आयोजन केले होते. संत सोपानकाका सहकारी बॅंक, सन्मित्र सहकारी बॅंक, साधना सहकारी बॅंक यासह विविध संघटनांनी फराळ व पाण्याचे वाटप केले. मांजरी फार्म येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व शेवाळेवाडी येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून फराळाचे वाटप केले. या वेळी सुरेश घुले, राहुल शेवाळे, अजिंक्‍य घुले, शिवाजी खलसे, डॉ. लाला गायकवाड आदी उपस्थित होते. भेकराईनगर येथे हरपळे हॉस्पिटलच्या वतीने वारकरी भाविकांसाठी मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते.

फुरसुंगीत भाविकांची गर्दी
फुरसुंगी ः माउली माउलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे लाखो वारकऱ्यांसोबत सासवड रस्त्याने फुरसुंगीत आगमन झाले. रांगोळ्या काढून व भजनांच्या गजरात भेकराईनगर येथे या पालखीचे फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

हडपसर गाडीतळावरील विसावा घेऊन संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवड रस्त्याने सव्वाअकरा वाजता भेकराईनगर येथे आली. सकाळी आठ वाजल्यापासूनच रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

दिंडीप्रमुखांचे शाल व औषधाचे किट देऊन स्वागत केले गेले. फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध खासगी दवाखाने, मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनेही वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी करून औषधवाटप करण्यात आले. दर्शनानंतर माउलींची पालखी पुढे विसाव्यासाठी उरूळी देवाचीकडे मार्गस्थ झाली.

भक्तिरसात न्हाला गाडीतळ परिसर
भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि संतांच्या नामघोषाने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. हडपसर, मांजरी, मुंढवा परिसरातून आलेले नागरिकांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. या वेळी महापालिका प्रशासन, पोलिस, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व नागरिकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. वारकऱ्यांना सामाजिक, पर्यावरणपूरक, आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी सामाजिक सेवांनी पुढाकार घेतला. पोस्टर, पत्रके, निरनिराळी वेशभूषा यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करत प्रबोधनाचे काम केले.

वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम
मुंढवा - भवानी पेठेतील विठोबा मंदिरात रविवारी मुक्कामी असलेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकात पोचली. सासवड रस्त्याला वळून गाडीतळ येथे विसावा घेऊन पुढे सासवडकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी साडेअकराच्या सुमारास या चौकात पोचली. सोलापूर रोडवर विसावा घेऊन ती पुढे मार्गस्थ झाली. वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.

Web Title: #SaathChal Wari Palkhi rain Sant Dnyaneshwar Maharaj Sant Tukaram Maharaj