स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे धडे

Cleaning-Employee
Cleaning-Employee

पुणे - सांडपाणी व कचरासफाईचे काम करताना सफाई कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधने न चुकता वापरावीत, या उद्देशाने शहरातील ५०० सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

रोटरी क्‍लब ऑफ पुणे साउथ व स्टील इंडियाच्या पुढाकाराने कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कॅम फाउंडेशनद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘सेफ्टी किट’चे वाटप करण्यात आले. 

स्टील इंडियाने या उपक्रमास आर्थिक साह्य पुरविले आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक परिंद प्रभुदेसाई, विपणनप्रमुख शोभित बहल, एच. आर. व्यवस्थापक हेतल रावल, रोटरी क्‍लब ऑफ पुणे साउथचे अध्यक्ष अभिजित जोग, महापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कॅम फाउंडेशनच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी स्मिता सिंग, सल्लागार मनोहर कृष्णा, घनकचरा विभागाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी घाटगे, पर्यावरणसंवर्धन अधिकारी मंगेश दिघे आदी उपस्थित होते. 

अभिजित जोग म्हणाले, ‘‘सीमेवर लढणारे सैनिक आणि देश समृद्ध करण्यासाठी झटणारे शेतकरी व कामगार यांच्या बरोबरीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्थान असून, स्वच्छता कर्मचारी सक्षम झाला, तरच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होऊ शकते. हा उपक्रम केवळ ५०० कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न राहता त्याची व्याप्ती आणखी वाढविण्यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे.’’ 

‘पुण्यात प्रतिदिन २१०० मेट्रिक टन कचरा तयार होत असून, त्यातील १५०० मेट्रिक टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया केली जाते,’’ असे सांगून मोळक म्हणाले, ‘‘पुण्यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५७ प्रकल्प आहेत. त्यात नजीकच्या भविष्यात आणखी पाच प्रकल्पांची भर पडणार आहे. ३१ डिसेंबरनंतर उरुळी-फुरसुंगीला एक किलोदेखील कचरा न पाठविता सर्व कचऱ्यावर शहरातच प्रक्रिया करण्याचे आमचे लक्ष्य आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com