Bandal
Bandal

साहिल बांदलने सर केले किलिमांजारो

शिरूर (पुणे) : आफ्रिका खंडातील सर्वोच्च मानले गेलेले, टांझानिया देशातील किलिमांजारो हे सुमारे 19 हजार 341 फूट उंच शिखर शिरूरमधील साहिल दत्तात्रेय बांदल या युवकाने सर केले. या शिखरावर सुमारे 115 फुटांचा तिरंगा फडकाविला.

"हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' व "इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'साठी साहिल बांदल याने ही कामगिरी केली. साहिलसह दहा तरुणांच्या पथकाने या सर्वोच्च शिखरावर जाऊन 115 फुटी तिरंगा फडकाविला. नऊ सप्टेंबरला या तरुणांनी ही मोहीम सुरू केली. अत्यंत अवघड चढाई, सुरवातीला मुसळधार पाऊस, नंतर कोरडे हवामान व प्रचंड ऊन या नैसर्गिक संकटांचा सामना करीत साहिलने चार दिवसांच्या अथक परिश्रमातून हे शिखर सर केले. 15 सप्टेंबरला रात्रभर उणे 15 अंश तापमानात एकावर एक सहा कपडे घालून हे अवघड शिखर त्याने गाठले. सकाळी नऊ वाजता "भारत माता की जय'च्या घोषात 115 फुटांचा तिरंगा फडकावून विश्‍वविक्रम केला.
पुण्याच्या "गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनेरिंग' या संस्थेने या मोहिमेचे आयोजन केले होते. "एव्हरेस्ट वीर' कृष्णा ढोकले यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेत पुण्यासह, मुंबई व हरियाना येथील दहा युवक सहभागी झाले होते. सरासरी शंभरपैकी साठ जणच हे शिखर सर करू शकतात, असे आजवरचे विक्रम आहे. तथापि, या मोहिमेतील शंभर टक्के युवकांनी यशस्वी चढाई करून हे शिखर सर केले. टांझानिया सरकारने या कामगिरीबद्दल साहिलसह पथकाचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

माउंट एल्ब्रुस करणार सर...
साहिल बांदल याने यापूर्वी हिमाचल प्रदेश येथे बेसिक माउंटेनेरिंग व अरुणाचल प्रदेश येथे संरक्षण विभागांतर्गत ऍडव्हान्स माउंटेनेरिंग हे कोर्स पूर्ण करताना शिखर सर केले आहेत. त्याचप्रमाणे, गुजरात सरकारचा "बेसिक रॉक क्‍लाइंबिंग' हा कोर्स अल्फा ग्रेडसह पूर्ण केला आहे. जगातील उर्वरित सर्वोच्च सहा शिखरे सर करण्याचा साहिलचा मानस असून, युरोप खंडातील सर्वोच्च माऊंट एल्ब्रुस हे शिखर लवकरच सर करणार असल्याचे त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com