आळंदीतील पूराचा व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा...

विलास काटे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आळंदीत इंद्रायणीला पूर आला आहे. मात्र, मंदिरात पाणी शिरेल एवढ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नाही.

आळंदी (पुणे): आळंदीत इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला आणि पंधरा वर्षांनंतर माउली मंदिरात पाणी शिरल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे. वास्तविक आळंदीत इंद्रायणीला पूर आला आहे. मात्र, नदीपात्राच्या तुलनेत मंदिर उंचावर असून पुराचे पाणी मंदिरापासून दूरवर आहे.

हा खोटा व्हिडिओ राज्यभरात सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने आळंदी ग्रामस्थांना मोबाईलवरून वारंवार विचारणा होत आहे. मावळ भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे आळंदीत इंद्रायणीला पूर आला आहे. मात्र, मंदिरात पाणी शिरेल एवढ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नाही.

सध्या इंद्रायणीवरील भक्ती सोपान हा पूल पाण्याखाली गेला आहे. भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले असून शनी मंदिराच्या पायऱ्याला पुराचे पाणी लागले आहे. शनी मंदिराकडून माउली मंदिराकडे येणारा दगडी मार्ग सध्या सुस्थितीत आहे. नदीवरील वाहतुकीसाठीचा एक जुना दगडी पूल आणि तीन नवीन पुलापासून पुराचे पाणी तीन ते चार फुटांपेक्षाही खाली आहे. त्यामुळे मंदिराला पुराच्या पाण्याचा सध्या तरी धोका नाही.

याबाबत मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले, "सध्या इंद्रायणीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. मात्र, मुख्य समाधी मंदिरात पुराचे पाणी गेलेले नाही आणि जाणारही नाही. समाधी मंदिराला पुराचा कुठलाही धोका नाही.''

 
मंदिरात पाणी येणार नाही : वीर
याबाबत आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर म्हणाले, "संबंधित व्हिडिओ खोटा आहे. मंदिराची उंची जास्त असून नदीपात्रही मंदिरापासून लांब आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी भिंतीचे संरक्षण असल्याने पाणी शिरण्याचा प्रश्नच नाही.''

 हा खोटा व्हिडिओ रविवारपासून व्हायरल झाला आहे. आळंदीत अशी परिस्थिती नसून ती अफवा आहे. नागरिकांनीही अशा अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करू नये.
-रवींद्र चौधर,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,आळंदी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saint dnyneshwar maharaj temple away from indryani flood

फोटो गॅलरी