वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या देखभालीची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा अनुक्रमे २४ व २५ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा अनुक्रमे २४ व २५ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी झालेल्या वैष्णवांचा मेळा टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होणार आहे. त्यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’तर्फे ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या देखभालीची’ या संकल्पनेतून ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान, देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान आणि स्वयंसेवी संस्थांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. 

पहिला टप्पा २५ जून रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीतील विठ्ठल मंदिर असा असेल. २६ जून रोजी पहाटे पाच ते सकाळी ११ या वेळेत आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते फुगेवाडीदरम्यान असेल. ही वाटचाल सहा टप्प्यात होईल. त्यानंतर २८ जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत पुण्यातील पुलगेट ते हडपसर गाडीतळ दरम्यान वाटचाल असेल. याचे दोन टप्पे असतील. 

असे असेल नियोजन
‘साथ चल’ उपक्रमाच्या वाटचालीचे नऊ टप्पे.
प्रत्येक टप्प्यातील अंतर दीड ते दोन किलोमीटर.
प्रत्येक टप्प्यात सहभागी होणारे नागरिक वेगवेगळे असतील.
प्रत्येक टप्प्यात सेलिब्रिटी, मान्यवर आणि भाविकांना कुटुंबाची विशेषतः आई-वडिलांच्या देखभालीची जबाबदारी घेण्याबाबत शपथ दिली जाईल. त्यानंतर पुढील टप्पा सुरू होईल.

कोण होऊ शकतो सहभागी? 
प्रत्येक टप्प्याच्या वाटचालीत भजनी मंडळे, गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, गृहनिर्माण सोसायट्या, व्यवस्थापन, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंपन्यांचे अधिकारी, कामगार, सेलिब्रिटी, व्यापारी, वकील, उद्योजक, साहित्यिक, कामगार संघटनांचे सदस्य, पदाधिकारी आदींना सहभागी होता येणार आहे. 

सहभाग नोंदणीसाठी व्हॉट्‌सॲप क्रमांक - ७७२१९७४४४७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saint Tukaram Maharaj and Saint Dnyaneshwar Maharaj palkhi