बेला लोळगेने पटकाविला "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र'चा किताब 

बेला लोळगेने पटकाविला "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र'चा किताब 

मिताली श्रीवास्तव ही फर्स्ट रनरअप आणि रिया जोशी ठरली सेकंड रनरअप 
पुणे - आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या मराठमोळ्या लावण्यवतींचे कॅटवॉक... गायन, नृत्य आणि लावणीच्या ठेक्‍यावर रंगीबिरंगी झगमगाटात रंगलेल्या सोहळ्यात "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2020'चा किताब औरंगाबादच्या बेला लोळगे हिने पटकाविला. पुण्याची मिताली श्रीवास्तव ही फर्स्ट रनरअप आणि रिया जोशी ही सेकंड रनरअप ठरली. 

हडपसर येथील अमनोरा टाऊनशिप क्‍लबमध्ये सायंकाळी सातपासून या रंगारंग सोहळ्यास सुरुवात झाली. राज्यभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या सौंदर्यवतींनी सुरुवातीला भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या साड्यांच्या वैविध्यपूर्ण रंगसंगतीने फुललेले, चमकदार प्रकार नेसून रॅंपवर वॉक करीत आपल्या संस्कृतीचे संचित समोर आणले. प्रेक्षकांनीही त्यांना टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. 

"एमजे फाइव्ह' या नृत्यसमूहाने स्पर्धेदरम्यान शैलीदार आणि वैविध्यपूर्ण नृत्यसादरीकरणाची पेरणी करीत या सोहळ्यात आणखी बहार आणली. 

सौंदर्यवतींमध्ये असलेल्या कौशल्याची परीक्षा स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत झाली. कुणी गायन, अभिनय, कुणी शास्रीय नृत्य तर कुणी बॉलिवूड गाण्यांवर नृत्य सादर करीत प्रेक्षकांना ठेका धरायला तर लावलाच; पण सौंदर्याबरोबर त्यांच्यात असलेल्या कलागुणांचे दर्शनही अप्रतिम सादरीकरणातून घडविले. शेवटच्या फेरीदरम्यान वेस्टर्न ऑउटफिटचे अनेक प्रकार घेऊन या सुंदरी रॅंपवर अवतरल्या. त्यांच्या चालीतील लकब, आत्मविशास, स्वत:ला सिद्ध करण्याचे कौशल्य याला दाद मिळाली. 

सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्तेचाही कस 
स्पर्धेचा शेवटचा भाग हा सर्वांची उत्सुकता वाढविणारा म्हणजेच निकालाचा असतो. त्यासाठी 21 मधून नऊ जणींची निवड परीक्षकांनी केली. त्यांना बुद्धीचा कस लावणारे प्रश्न विचारण्यात आले. त्यात सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ताही सिद्ध करीत मिताली श्रीवास्तव ही या स्पर्धेत फर्स्ट रनरअप, रिया जोशी सेकंड रनरअप ठरली. प्रेक्षकांच्या पसंतीची दखलही या वेळी घेण्यात आली. मंचावर येणाऱ्या सुंदरींमधील वेगवेगळे गुण जोखत प्रेक्षकांनी सलोनी कडू या सौंदर्यवतीला पसंती दिली. त्यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com