‘सकाळ दिवाळी पहाट’ला भरभरून दाद

Diwali-Pahat
Diwali-Pahat

पुणे/ कोथरूड - दिवाळीच्या निमित्ताने पुणेकर रसिकांसाठी गीतसंगीताचा सुरेल नजराणा असलेल्या दोन दिवसांच्या ‘सकाळ दिवाळी पहाट’ कार्यक्रमामध्ये पुणेकर रसिकांनी भक्तिगीतांसह शास्त्रीय संगीताचा आनंद मनमुराद लुटला. पहिल्या दिवशी गदिमा व्यासपीठनिर्मित ‘नाम घेता’ आणि दुसऱ्या दिवशी भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या ‘रंजीश ही सही’ या ‘सकाळ दिवाळी पहाट’ कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी करीत भरभरून दाद दिली.

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कर्वेनगर येथील पंडित फार्ममध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी पहाटे ‘सकाळ’ने दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. 

या वेळी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे झोनल मॅनेजर सुशील जाधव, रोझरी एज्युकेशन सोसायटीचे व्यपस्थापकीय विश्वस्त विनय आरान्हा, व्यंकटेश बिल्डकोन प्रा. लि.चे चेअरमन व एमडी अंकुश आसबे आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापक राकेश मल्होत्रा उपस्थित होते.

नाम घेता या कार्यक्रमामध्ये प्रभात समयो पातला, मातृवंदना, विकत घेतला शाम, कबीराचे विणतो शेले, सावळा ग रामचंद्र, थकले रे नंदलाला, एकवार पंखावरून, एक धागा सुखाचा, काल मी रघुनंदन पाहिले, कानडा राजा पंढरीचा अशी एकापेक्षा एक सुरेल गीते सादर करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आनंद माडगूळकर यांनी गायन व निरूपण केले. संकल्पना ग. दि. माडगूळकर यांची नात हर्षदा माडगूळकर- उटगीकर यांची होती. अभिजित सातभाई, मीनल पोंक्षे, श्रेया माडगूळकर - सरपोतदार, विद्याधर पारखे, विलास क्षीरसागर, पद्माकर गुजर, कुमार करंदीकर, प्रणव कुलकर्णी, प्रतीक गुजर हे सहकलाकार यात सहभागी झाले होते. 

भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या ‘रंजीश ही सही’ या कार्यक्रमानेही शुक्रवारी उपस्थितांची मने जिंकली. पहाटेच्या गुलाबी थंडीमध्ये रागदारी, बंदीशी आणि त्याला सिनेभावगीतांची जोड अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. निवडक दहा रागांवर आधारित भय इथले संपत नाही, माना के जिद ना करो, माझे जीवनगाणे, सहेला रे, ज्योती कलश, हाय रामा ये क्‍या हुआ, आता ग्रहण आहे, जिवलगा राहिले दूर घर माझे, सांगू कशी मी कुणाला, किस्मत से तुम हम को मिले हो, तू मिले दिल खिले अशी भावगीते, भक्तिगीते, चित्रपट गीते, गझल, ठुमरी, मुजरागीते आणि नाट्यगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन ‘ग्रहण’ फेम योगेश देशपांडे यांची होती. अभिवाचन योगेश देशपांडे व अपूर्वा मोडक यांनी केले, तर ‘सूर नवा ध्यास नवा’तील अनिरुद्ध जोशी व शरयू दाते यांनी गायन केले. प्रसन्न बाम, अजय अत्रे, झंकार कानडे, अंजली शिंगाडे - राव, प्रणव हरदास यांनी वादन साथ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com