रंगरेषांनी साकारले अंतरंगातील भावविश्‍व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पिंपरी - रविवार असूनही सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत चिमुकल्यांची पावले शाळांकडे वळत होती. काहींच्या अंगात स्वेटर होते. काहींनी शाळेचा युनिफॉर्म परिधान केला होता, तर काहींनी आवडीचा ड्रेस घातला होता. पाठीवर सॅक होती. त्यात होते पॅड, कंपास पेटी, कलर बॉक्‍स. हातात पाणी बॉटल अन्‌ खाऊच्या डब्याची पिशवी. सोबत होते काहींचे वडील. काहींची आई. काहींचे मोठे बहीण-भाऊ, तर काहींचे आजी-आजोबा. बघता बघता शाळांची प्रांगणे फुलून गेली आणि पेन्सिलने चित्रे साकारू लागली. वेगवेगळ्या रंगरेषांच्या संगतीने चित्रे बोलके होऊ लागली. निमित्त होते ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चे. 

चेहऱ्यावर झळकला आनंद 
‘मोर’, ‘फुलदाणी’, ‘गणेशोत्सव मिरवणूक’, ‘बागेत खेळणारी मुले’, अशी विविध चित्रे रंगविण्यात बालचित्रकार रंगून गेले होते. चिंचवड येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालयात हे चित्र पाहण्यास मिळाले. ‘शाळेतील फन फेअर’, ‘आजी-आजोबांसोबत कौटुंबिक सहल’, ‘माझे आवडते कार्टून’ असे आकर्षित करणारे विविध विषय चित्रातून रेखाटण्यात विद्यार्थी व्यग्र होते. आकुर्डी, निगडी, चिंचवड स्टेशन परिसरातील विद्यार्थ्यांनी या केंद्रात उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग नोंदविला. 

कौटुंबिक सहल 
अलीकडे प्रकर्षाने जाणवणाऱ्या विभक्त कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा दिसेनासे झाले आहेत. पण, हीच उणीव अनेक मुलांनी कुंचल्यातून कागदावर साकारली आणि आपले भावविश्‍व चितारले, कारण विषय होता ‘कौटुंबिक सहल’. या विषयावरील चित्र रंगवतांना बहुतांश विद्यार्थ्यांनी चौकोनी कुटुंबाच्या सहलीत आजी-आजोबांचे चित्रही साकारले होते. 

‘सकाळ’तर्फे दरवर्षी चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. मुलांच्या दृष्टीने ही खूप चांगली व आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मुलांचाही त्याला उत्साही प्रतिसाद मिळतो. मुलांसाठी ही स्पर्धा विशेष आनंद देणारी ठरते आहे.
- वंदना मिश्रा, चित्रकला शिक्षिका 

‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत मी दरवर्षी भाग घेतो. शिक्षक आम्हाला चित्रकलेचे नवनवे धडे देतात. त्याचा आम्हाला चांगला फायदा होतो. या स्पर्धेपासून प्रेरणा मिळाली आहे. नवनवीन चित्र काढून ते रंगविण्याचा आनंद घेता येतो. 
- अंशू गुप्ता, विद्यार्थी

प्राधिकरणात प्रतिसाद
प्राधिकरणातील गुरुगणेश विद्या मंदिर केंद्रावर काही जण थंडीत कुडकुडत, तर काही जण स्वेटर, जर्किन घालून पालकांसमवेत आले होते. पहिली, दुसरीतील बहुतांश विद्यार्थी प्रथमच अशा स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे पालकांमध्ये मुलांच्या चित्रकलेबाबत उत्सुकता होती. शिक्षकांनी पटांगणावर ‘सकाळ’ शब्द आखला होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना बसविले. रविवार सुटी असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला होता. शिक्षकांनी केलेल्या सूचनांचे विद्यार्थी तंतोतंत पालन करीत होते. अन्य शाळांचे विद्यार्थीही या केंद्रावर आले होते. 

Web Title: Sakal Drawing Competition