रंगमयी आविष्काराची मुलांकडून अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - अंतराळात यंत्रमानवाशी झालेली दोस्ती... फॅशनेबल सायकलींचे बाजारपेठेत थाटलेलं दुकान... रेल्वे क्रॉसिंगच्या गेटवर धोक्‍याचा दिलेला इशारा अशा असंख्य डोळ्यांत टिपलेल्या आणि मनात साठविलेल्या गोष्टी रविवारी नानाविध रंगरेषांच्याद्वारे कॅनव्हासवर उतरल्या. बघता-बघता शालेय विद्यार्थ्यांनी आपलं भावविश्‍व कोऱ्या कॅनव्हासवर रंग उमटवीत उतरविलं... एवढंच नव्हे तर आपल्या आवडत्या रंग-रेषांच्या दुनियेची सफर घडविली. निमित्त होते रविवारी झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

जिल्ह्यातील  विविध भागांतील हजारो शाळांमध्ये ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रविवार म्हटलं की बच्चे कंपनीसाठी हक्काच्या सुटीचा दिवस, मात्र असे असतानाही लहान मुले मोठ्या उत्साहाने सकाळी लवकर उठली, केवळ उठलीच नाही तर रंगपेटी, पेन्सिल, रंगीत खडू असे चित्रकलेचे साहित्य बॅगेत भरून पालकांसमवेत त्यांची पावले स्पर्धा केंद्राच्या दिशेने पडू लागली. हवेतील काहीशा गारव्याने मुलांच्या उत्साहात नवचैतन्याचे रंग भरण्यास सुरवात केली. चित्रकलेच्या विषयाची प्रश्‍नपत्रिका हाती पडताच विद्यार्थ्यांनी कोऱ्या कॅनव्हासवर पट्टी, पेन्सिलच्या साह्याने चित्र रेखाटण्यास सुरवात केली. स्पर्धेच्या वेळेचे घड्याळ पुढे सरकत असताना कॅनव्हासवर विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील भावविश्‍व रंगांद्वारे उमटत होते.

रंगांमधून उलगडले भावविश्‍व
एरवी चित्र काढण्याचा फारसा सराव नसतानाही मुलांनी आश्‍चर्यचकित करणारी चित्रं काढली. खरंतर प्रत्येक चित्रातून त्यांचे भावविश्‍व ओतप्रोत भरलेलं दिसलं. कल्पनाशक्तीच्या जोरावर अशक्‍यप्राय अन्‌ सहज शक्‍य असणाऱ्या गोष्टी त्यांनी चित्रातून व्यक्त केल्या. नीटनेटकी आणि स्वच्छतेचा धडा देणारी भाजी मंडई, धूरफेक करणाऱ्या वाहनांच्या गर्दीत शिस्तबद्ध पद्धतीने वेग घेणारी सायकल शर्यत, स्वप्नातील परसबाग, रेल्वे क्रॉसिंगचं गेट आणि त्याभोवती असणारे सूचना फलक, दुरावलेल्या नात्यांचा धागा पुन्हा एकदा गुंफणारी आजी-आजोबांसमवेत काढलेली कौटुंबिक सहल, मोकळ्या आणि भव्य मैदानात विविध खेळ खेळण्याचा आनंद, जवळचा मित्र वाटणारा लाडका ‘पप्पी’, गारेगार आइस्क्रीमची मजा असं काहीसं कल्पनेतील, तर काहीसं प्रत्यक्षात असणारं भावविश्‍व मुलांनी कॅनव्हासवर उतरविले.

Web Title: Sakal Drawing Competition