विद्यार्थ्यांमध्ये रंगला रंगांचा उत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती कागदावर उतरून त्याला कल्पनांचे रंग भरत विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. रंगांचा हा उत्सव बालमित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रंगांची देवणा-घेवाण करत चिमुकल्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली. मुलांनी पालकांबरोबर सकाळी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती कागदावर उतरून त्याला कल्पनांचे रंग भरत विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. रंगांचा हा उत्सव बालमित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रंगांची देवणा-घेवाण करत चिमुकल्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली. मुलांनी पालकांबरोबर सकाळी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

मुलांनी छंद जोपासावेत
वारजे - नवभारत ज्ञानवर्धिनीचे स्मिता पाटील विद्या मंदिरमध्ये स्पर्धा उत्साहात झाली. वारजे माळवाडी परिसरातील विविध शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे व सहकाऱ्यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.

ज्योती सवाईसर्जे (पालक प्रतिनिधी) - धावपळीच्या जीवनात मुलांनी छंद जोपासला पाहिजे. या स्पर्धेमुळे मुलांच्या कलेला प्रोत्साहन व ती मांडण्याची संधी मिळते.

संतोष घुले (पर्यवेक्षक) - अंतःकरणातील आशय प्रकट करणे म्हणजे चित्रकला होय. स्पर्धेमध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे आपली कला मांडली.

रवी भोसले (विद्यार्थी प्रतिनिधी) - चित्रांचे विषय विचार करायला लावणारे होते. ‘सकाळ’मुळे नवीन विषय मांडण्याची संधी मिळाली.

संतोष गुरव (वारजे माळवाडी) - ही स्पर्धा गेली अनेक वर्षे मी पाहत आलो आहे. मी लहान असताना कोल्हापूरमध्ये या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालो होतो. आता त्याच स्पर्धेत माझा मुलगा सहभागी झाला आहे.

सहभागी होणेही महत्त्वाचे
गोखलेनगर - किलबिल हायस्कूल, जनवाडी येथील केंद्रावरील स्पर्धेत भारतीय भवन शाळा, सेनापती बापट रस्ता, रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय, लॉ कॉलेज रस्ता, विद्या भवन स्कूल, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर, श्री शिवाजी प्राथमिक लष्करी शाळा, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शिवाजीनगर या भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 

रफत खान (मुख्याध्यापिका किलबिल स्कूल) - स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळाला. जिंकणे महत्त्वाचे नसून सहभागी होणेही हे तेवढेच महत्त्वाचे आहे. 

संतोष केदारी (पालक, गोखलेनगर जनवाडी) - आयत्या वेळी दिलेल्या विषयाचे चित्र काढण्यासाठी मुलांना सवय लागते. मी नेहमी चित्रकला स्पर्धेत माझ्या मुलीला पाठवतो, असे उपक्रम नक्कीच मार्गदर्शक ठरतात.

साक्षी भोरे (विद्यार्थी) - मला या स्पर्धेमुळे एक वेगळाच अनुभव आला. क्रमांक आला किंवा नाही तरी चालेल; परंतु मिळणारा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. 

श्रीतेज पाटील (विद्यार्थी) - ही स्पर्धा आमच्या शाळेत दर वर्षी घेतली जाते. परीक्षेच्या वेळी विषय दिल्याने माझी कल्पनाशक्ती विकसित होण्यास मदत झाली. विचारशक्ती वाढली.

स्पर्धेतून सामाजिक संदेश
सहकारनगर - गुलटेकडी येथील महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया हायस्कूल येथे मुकुंदनगर, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड परिसरातील मुलांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा उत्साहात झाली. शिक्षक माधुरी देशमुख, श्रद्धा पोंक्षे, संपदा खर्डीकर, मेधा पोतदार, ऋचा संत, गौरी पवार, संतोष खाटपे यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. मुख्याध्यापिका अर्चना शहाणे म्हणाल्या, ‘‘मुलांनी रेखाटलेली चित्रे सामाजिक संदेश देणारी आहेत. उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.’’  

अपूर्वा जोशी (पालक) - माझी मुलगी हॅचिंग स्कूलमध्ये दुसरीमध्ये शिकत आहे. तिला चित्रकला आवडे. या स्पर्धेमुळे मुलांना आपला व्यक्तिमत्त्व विकास होण्यास चालना मिळते.

दीपाली कोळी (गृहिणी मुकुंदनगर) - स्पर्धेतून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असून, हा चांगला उपक्रम आहे. मुलांना काही तरी करण्यासाठी जिद्द निर्माण होते.

वनिता नहार (मुकुंदनगर) - आमच्या घरातील यश, आरेन, रिद्धी या तीन मुलांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे वेळेचे नियोजन आणि विषय चांगले आहेत. 

डॉ. संपदा सुराणा (आदिनाथ सोसायटी) - मुलांना चित्रांच्या माध्यमातून कौशल्य गुणांना वाव मिळतो. ‘सकाळ’ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत चांगले उपक्रम राबवत आहे.

Web Title: Sakal Drawing Competition