रंगमयी आविष्काराची अनुभूती

धानोरी - रंग-रेषांच्या दुनियेची सफर घडवीत असताना विद्यार्थ्यांनी चक्क मैदानावरही अनोखं चित्रं रेखाटत नवा संदेश दिला. श्री. एकनाथराव खेचे विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले ‘सकाळ’वरील प्रेम.
धानोरी - रंग-रेषांच्या दुनियेची सफर घडवीत असताना विद्यार्थ्यांनी चक्क मैदानावरही अनोखं चित्रं रेखाटत नवा संदेश दिला. श्री. एकनाथराव खेचे विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले ‘सकाळ’वरील प्रेम.

पुणे - अंतराळात यंत्रमानवाशी झालेली दोस्ती... फॅशनेबल सायकलींचं बाजारपेठेत थाटलेलं दुकान... रेल्वे क्रॉसिंगच्या गेटवर धोक्‍याचा दिलेला इशारा, अशा असंख्य डोळ्यांनी टिपलेल्या आणि मनात साठविलेल्या गोष्टी रविवारी नानाविध रंग-रेषांद्वारे कॅनव्हासवर उतरल्या. बघता बघता शालेय विद्यार्थ्यांनी आपलं भावविश्‍व कोऱ्या कॅनव्हासवर रंग उमटवीत उतरविलं... एवढंच नव्हे तर आपल्या आवडत्या रंग-रेषांच्या दुनियेची सफर घडविली. निमित्त होते रविवारी झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

शहरातील मध्यवर्ती भागासह कोथरूड, कात्रज, कोंढवा, हडपसर, येरवडा, वाघोली, धानोरी, औंध, बावधन, पाषाण अशा विविध भागांतील हजारो शाळांमध्ये ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. लहान मुलांच्या कल्पनेला रंगांच्या माध्यमातून नवे अवकाश निर्माण करून ही स्पर्धा देणारी ठरली.

रविवार म्हटलं की बच्चे कंपनीसाठी हक्काच्या सुटीचा दिवस, मात्र असे असतानाही लहान मुले मोठ्या उत्साहाने सकाळी लवकर उठली, केवळ उठलीच नाही तर रंगपेटी, पेन्सिल, रंगीत खडू असे चित्रकलेचे साहित्य बॅगेत भरून पालकांसमवेत त्यांची पावले स्पर्धा केंद्राच्या दिशेने पडू लागली.

हवेतील काहीशा गारव्याने मुलांच्या उत्साहात नवचैतन्याचे रंग भरण्यास सुरवात केली. पालकांच्या उपस्थितीने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. चित्रकलेच्या विषयाची प्रश्‍नपत्रिका हाती पडताच विद्यार्थ्यांनी कोऱ्या कॅनव्हासवर पट्टी, पेन्सिलच्या साह्याने चित्र रेखाटण्यास सुरवात केली. स्पर्धेच्या वेळेचे घड्याळ पुढे सरकत असताना कॅनव्हासवर विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील भावविश्‍व रंगांद्वारे उमटत होते.

मित्र-मैत्रिणींसमवेत चित्र काढण्याचा आनंद... रंगपेट्या, रंगीत पेन्सिल-खडूचं एकमेकांमध्ये होणार शेअरिंग... चित्र काढताना विविध रंगांनी रंगलेली लहान बोटं... शेजारच्यापेक्षा आपलं चित्र अधिक चांगलं होण्यासाठी लागलेली मजेदार चुरस... शेवटच्या टप्प्यात आपल्या मित्र-मैत्रिणीचे चित्र पूर्ण होण्यासाठी केली जाणारी मदत... एखादीचे चित्र पूर्ण करण्यासाठी जमलेला मैत्रिणींचा गट... तर चित्र काढताना ‘माझ्या रंगाला हात लावायचा नाही हं’ असे म्हणत असतानाही क्षणार्धात मिटणारे रुसवे-फुगवे अन्‌ पुन्हा मदतीसाठी पुढारलेले रंगीत हात... असा रंगमयी आविष्काराची अनुभूती अनेकांनी घेतली.

चित्रकला स्पर्धा सकाळी नऊ ते साडेदहा आणि सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा अशा दोन टप्प्यांत घेण्यात आली. पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांना प्रत्येकी सहा विषय दिले होते.

रंगांमधून उलगडले भावविश्‍व
एरवी चित्र काढण्याचा फारसा सराव नसतानाही मुलांनी आश्‍चर्यचकित करणारी चित्रं काढली. खरंतर प्रत्येक चित्रातून त्यांचं भावविश्‍व ओतप्रोत भरलेलं दिसलं. कल्पनाशक्तीच्या जोरावर अशक्‍यप्राय अन्‌ सहज शक्‍य असणाऱ्या गोष्टी त्यांनी चित्रातून व्यक्त केल्या. नीटनेटकी आणि स्वच्छतेचा धडा देणारी भाजी मंडई, धूरफेक करणाऱ्या वाहनांच्या गर्दीत शिस्तबद्ध पद्धतीने वेग घेणारी सायकल शर्यत, स्वप्नातील परसबाग, रेल्वे क्रॉसिंगचं गेट आणि त्याभोवती असणारे सूचना फलक, दुरावलेल्या नात्यांचा धागा पुन्हा एकदा गुंफणारी आजी-आजोबांसमवेत काढलेली कौटुंबिक सहल, मोकळ्या आणि भव्य मैदानात विविध खेळ खेळण्याचा आनंद, जवळचा मित्र वाटणारा लाडका ‘पप्पी’, गारेगार आइस्क्रीमची मजा असं काहीसं कल्पनेतील, तर काहीसं प्रत्यक्षात असणारं भावविश्‍व मुलांनी कॅनव्हासवर उतरविलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com