करिअरबाबतची चिंताच मिटली

स्वारगेट - तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांना मिळालेला विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसाद.
स्वारगेट - तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांना मिळालेला विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसाद.

पुणे - उच्चशिक्षणाची पुढील दिशा आणि करिअरची चिंता करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ एज्युकेशन एक्‍स्पोमुळे वेगळ्या वाटा समजल्या. कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याची परिपूर्ण माहिती मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाचा आज (ता. ९) समारोप आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस होता. शिक्षण क्षेत्राबद्दल, तसेच अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. शिक्षण संस्थांच्या स्टॉलवरील तज्ज्ञांनी अनेकांचे करिअरविषयी समुपदेशनही केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात दीर्घकाळ असलेल्या शंकांचे निरसन झाले.
एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्वच संधींची माहिती मिळाल्याने प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन माहिती मिळविण्याचे त्रास वाचल्याची भावना अनेक पालकांनी बोलून दाखविली. अनेक महाविद्यालयांतील युवक समूहाने येऊन या प्रदर्शनात माहिती घेत होते. इंजिनिअरिंग, डिझाइन, ॲनिमेशन, सनदी लेखापाल यांसह कला आणि वाणिज्य क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थी माहिती घेत होते. प्रदर्शनाबरोबरच विविध क्षेत्रांतील संधींबाबत तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आली, त्यालाही विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

माहितीची संधी उपलब्ध करून दिली. नवीन क्षेत्राबद्दल डायरेक्‍ट नामवंतांचे मार्गदर्शन मिळते. याचा मला प्रवेशप्रक्रियेत खूप फायदा होईल. 
- श्रुती वेल्हाळ, विद्यार्थी

मला वेगवेगळ्या कोर्सेसच्या प्रवेश परीक्षेची माहिती मिळाली. करिअर घडण्यासाठी खूप संधी आहेत, हे मला येथे आल्यानंतर समजले. यामध्ये योग्य पर्याय शोधून प्रवेश घेणार आहे. 
- शुभम निंबाळकर, विद्यार्थी

माझ्या पाल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश पाहिजे होता, सर्व माहिती त्याच्याबद्दल मिळाली. आम्हाला खूप कमी वेळात ही माहिती मिळाली. करिअरच्या संधीसाठी आम्हाला याचा उपयोग होईल.
- प्रीती कटारिया, पालक

एकाच छताखाली सर्व माहिती मिळते, आम्हाला सर्व संस्थांना भेट देणे अशक्‍य आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजपेक्षा येथे सविस्तर माहिती मिळते. 
- प्रमोद मोराळे, पालक

गेले दोन दिवस असंख्य विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील शंकांचे निरसन करणाऱ्या एज्युकेशन एक्‍स्पोचा उद्या (ता. ९) समारोप आहे. मात्र, उद्याही दोन तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली आहेत.

सकाळी ११ वाजता
वक्ते - पंकज व्हट्टे 
विषय - यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

सायं. ६ वाजता
वक्ते - अभय अभ्यंकर, डॉ. सुनील देशपांडे 
विषय - २०१९ मधील इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा

संधी असलेलेच क्षेत्र निवडा - संतोष रासकर
‘‘आज स्वतःच्या आवडीनिवडी महत्त्वाच्या नाहीत. तुम्हाला ज्या क्षेत्रात संधी आहे असे वाटते, त्या क्षेत्रात जाऊन ते तुम्ही कष्टाने गाजवा,’’ असे सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पोमध्ये संतोष रासकर यांनी ‘डिझायनिंगच्या संधी’ या सेमिनारमध्ये मार्गदर्शन केले.

डिझायनिंग क्षेत्रात कुशल मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे जगात मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीची चिंता करू नये, सरकारी आकड्यानुसार पुढील तीन वर्षांत भारतात अकरा लाख मनुष्यबळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्यापेक्षा आपला डिझायनिंगचा व्यवसाय टाकून दुसऱ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. तेथे तुम्ही स्वतः प्रॅक्‍टिसने त्यातील कौशल्ये शिकून या क्षेत्रात यशस्वी ठरू शकता. त्यामुळे न्यूनगंड न बाळगता आत्मविश्‍वासाने या क्षेत्रात करिअर करा.

संधीचा फायदा उठवा - प्रदीप खांदवे
‘काळानुसार स्वत:मध्ये बदल करून आलेल्या संधीचा फायदा घेतला तरच तुम्हाला यश मिळेल,’’ असे प्रदीप खांदवे यांनी ‘इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्‍निकमधील करिअर’ या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना सांगितले.

कोणत्या क्षेत्रात करिअर करणार आहोत, याचा निर्णय जीवनात खूप लवकर घेतला पाहिजे. दहावीपर्यंत ठाम निर्णय झाला पाहिजे. कारण बारावीनंतर काय करावे, याचा गोंधळ उडत नाही. इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना टेक्‍निकल ब्रॅंचला झुकते माप द्यावे, कारण येणारे जग हे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. पण, कौशल्ये विकसित केली पाहिजेत. यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करून चांगले करिअर उभे करू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com