पुण्यातील कोरोनाबाधीतांचे मृत्यू झाले कमी 

योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 13 October 2020

गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये इतक्‍या मृत्यूच्या बातम्या एकाच वेळी आपल्या कानावर आदळत होत्या. पण, गेल्या 11 दिवसांमध्ये कोरोनामृत्यूचं प्रमाण कमी झालंय, असा आशेचा किरण आता दिसू लागलाय. 

पुणे - आपल्या नात्यातील, ओळखीचे, परिचयातील यापैकी कोणाचा ना कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय. कधी नव्हे ते गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये इतक्‍या मृत्यूच्या बातम्या एकाच वेळी आपल्या कानावर आदळत होत्या. पण, गेल्या 11 दिवसांमध्ये कोरोनामृत्यूचं प्रमाण कमी झालंय, असा आशेचा किरण आता दिसू लागलाय. 

पुण्यातील कोरोनाचा पहिला मृत्यू 31 मार्चला पुण्यात झाला. त्यानंतर शहरात गेल्या 216 दिवसांमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या एक लाख 54 हजार 230 पर्यंत वाढली. यापैकी जवळपास तीन हजार 830 रुग्णांचा (2.50 टक्के) मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेने दिली. मृत्यू झालेल्यांपैकी 36 टक्के म्हणजे एक हजार 384 मृत्यू हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये झाले होते. त्यामुळे मे ते ऑक्‍टोबर या प्रत्येक महिन्यांतील 11 दिवसांमध्ये झालेल्या मृत्यूची सरासरी काढली. यावरून पुण्यातील कोरोना रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होते. पुण्यात गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पुढे येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर "सकाळ'ने हे विश्‍लेषण केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत्यूचे प्रमाण यामुळे झाले कमी 
1) रुग्णांचं निदान होतंय लवकर 
2) प्राथमिक लक्षणं असतानाच रूग्णावर प्रभावी उपचार 
3) उपचारांसाठी रुग्ण लवकर होतात रुग्णालयात दाखल 
4) इतर आजार असलेल्यांची तातडीने तपासणी 
5) रूग्णांना वेळेत मिळतो औषधोपचार 
6) सामान्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये गेल्याने बेडची उपलब्धता 
7) ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत 
8) उपचाराची नेमकी पद्धत समजली डॉक्‍टरांना 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपचाराचा गवसला सूर 
पुण्यातील डॉक्‍टर गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अनेक रुग्णांवर उपचार करून नेमक्‍या कोणत्या टप्प्यावर रुग्ण अत्यवस्थ होतो, हा अनुभव डॉक्‍टरांच्या गाठीशी आला. त्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचाराचा सूर गवसला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. विषाणूसंसर्गाची गांभीर्यता ओळखून रुग्णाला पहिल्या आठवड्यात अँटी व्हायरल इंजेक्‍शन दिले जाते. दुसऱ्या आठवड्यात रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देते, त्या आधारावर स्टिरॉईड दिले जाते. ही उपचार पद्धती सुरू केल्यापासून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील मृत्यूचे प्रमाण निश्‍चित कमी होत आहे. यापूर्वी दररोज 45 ते 60 कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत असे. ते प्रमाण आता 20 ते 25 पर्यंत कमी झाले आहे. 
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

रुग्ण व्यवस्थापनात सुधारणा झाली आहे. तसेच, पायाभूत सुविधांमध्येही वाढ होत आहे. त्याचवेळी रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सुरवातीच्या काळातील ऑक्‍सिजनचा पुरवठा, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. 
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal exclusive news Coronary mortality rates have dropped in pune