पुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

रुग्णांचे जीव जात असताना आणि ‘जम्बो’बाबत संताप उघड होऊनही बुधवारी आणि गुरुवारी‘जम्बो’त काहीही फरक दिसला नाही.रुग्ण व मृतांची नोंद करण्यासाठी कर्मचारी नसल्याने त्यांची नोंदणी होत नसल्याचे उघड झाले आहे

पुणे - जम्बो कोविड सेंटर चालविणारी ‘लाइफलाइन’ एजन्सीच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे गुरुवारी दिसून आले आहे. तोकडे मनुष्यबळ, रुग्णांना दाखल न करणे, त्यांना वेळेत जेवण न देणे या साऱ्या बाबींचा २४ तासांत खुलासा करा; अन्यथा कारवाईला तोंड द्या, अशी तंबी ‘पीएमआरडीए’ने एजन्सीला दिली आहे. एवढेच नव्हे; तर डॉक्‍टर, रूग्णवाहिका नसलेल्या ‘लाइफलाइन’कडे हे काम का सोपविले, अशी विचारणा विभागीय आयुक्त कार्यालयाने ‘पीएमआरडीए’ला केली आहे. एकूणच व्यवस्थेत सुधारणा न केल्यास ‘लाइफलाइन’चे काम काढून घेतले जाऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘जम्बो’तील गोंधळ पुढे येताच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयापासून महापालिकेनेही ‘लाइफलाइन’च्या कामावर बोट ठेवले आहे. परिणामी, प्रशासकीय यंत्रणांच्या पवित्र्यामुळे ‘लाइफलाइन’च्या कामात बदल होऊन, रुग्णांना अगदी सहजरीत्या आणि नेमके उपचार मिळण्याची आशा आहे. ‘जम्बो’ कारभारातील त्रुटींकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर येथील सुविधांत बदल करण्याची कार्यवाही होत आहे. उपचाराच्या आशेने जाणाऱ्या गरजू रुग्णांना ताटकळ ठेवण्यासोबत उपचारादरम्यान रुग्णांची हेळसांड होत असल्याची वस्तुस्थिती  ‘जम्बो’मध्ये होत असल्याचे दिसून आले. काही रुग्णांना वेळेत ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर न पुरविल्याने त्यांना जीवही गमवावा लागल्याच घटना आहेत. निविदेप्रमाणे व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडसह तज्ज्ञ डॉक्‍टर आणि परिचारिका नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘जम्बो’चा उद्देश साध्य होत नसल्याचे सांगत, ‘लाइफलाइन’वर कारवाईचा आग्रह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी धरला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने एजन्सीला नोटीस बजाविली आहे. 

Image may contain: one or more people, people standing, plant and outdoor, text that says "प्रशासकीय विभाग ADMIN BLOCK COMMAND ROOM OVID-19 OSPITAL COEP GROUND PUNEMAHARASHTRA PUNE, MAHARASHTRA COMMAND ROOM प्रतिबंधित क्षेत्र RESTRICTED AREA"

नऊ मृतदेह पडून 
रुग्णांचे जीव जात असताना आणि ‘जम्बो’बाबत संताप उघड होऊनही बुधवारी आणि गुरुवारी ‘जम्बो’त काहीही फरक दिसला नाही. रुग्ण आणि मृतांची नोंद करण्यासाठी कर्मचारी नसल्याने त्यांची नोंदणी होत नसल्याचे उघड झाले आहे. तेव्हा मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स नसल्याने नऊ मृतदेह तासनतास जागेवरच राहिले. ही स्थिती कानावर येताच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने ॲम्ब्युलन्स उपलब्ध करीत बुधवारी ६ आणि गुरुवारी ३ मृतदेह नेले. त्यामुळे अंत्यसंस्कार करणे शक्‍य झाले. 

महापालिकेने पुरवले बारा डॉक्‍टर 
‘जम्बो’त रुग्ण वाढत असताना ‘लाइफलाइन’ने गेल्या दोन दिवसांत एकही डॉक्‍टर वाढविला नसल्याची बाब विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आली आहे. त्यानंतर महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जम्बोसाठी १२ डॉक्‍टर पुरविण्यात आले आहेत. डॉक्‍टर आणि परिचारिका उपलब्ध होत नसल्याचे ‘लाइफलाइन’ सांगत आहे. त्यामुळे जम्बो चालविण्याची जबाबदारी महापालिकेलाचा पार पाडावी लागत आहे.

Image may contain: drawing, text that says "क्षमता काय सांगते वास्तव ६०० ऑक्सिजन बेड प्रत्यक्षात ६०० तयार क्षमता २०० आयसीयूबेड प्रत्यक्षात ६० रुग्णांची संख्या ३४३ දං ऑक्सिजन आयसीयू"

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांना पाचारण
जम्बोतील उपचार व्यवस्थेबाबत सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून, व्यवस्थापकावर कारवाईची भीती महापालिकेने बुधवारी रात्री दाखविली. तेव्हा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी ‘जम्बो’च्या आवारात होते. पोलिसांच्या धाकानंतर तरी एजन्सी ताळ्यावर येण्याची आशा प्रशासनाला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘जम्बो’त उपचारापासून रुग्णांच्या जेवणाबाबतही तक्रारी असल्याचे पत्र महापालिकेने दिले आहे, त्यानुसार ‘लाइफलाइन’ला नोटीस पाठविली आहे. त्यावर २४ तासांत खुलासा मागविला असून तो आल्यानंतर समितीच्या माध्यमातून कारवाई केली जाईल.
- सुहास दिवसे,  ‘सीईओ, पीएमआरडीए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal-exclusive news Pune Jumbo Covid Center