Pune : अखेर प्रशासनाला जाग; खडकवासला चौपाटी परिसरात नियोजनासाठी संयुक्त पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact traffic jam Khadakwasla Chowpatty pune measures

Pune : अखेर प्रशासनाला जाग; खडकवासला चौपाटी परिसरात नियोजनासाठी संयुक्त पाहणी

किरकटवाडी: लाखो पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात हजारो पर्यटक उतरुन हुल्लडबाजी करत प्रदुषण करत असल्याबाबत व खडकवासला चौपाटी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याबाबत सकाळ'ने सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे.

पुणे ग्रामीण पोलीसांच्या पुढाकाराने पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौपाटीवरील विक्रेत्यांसह खडकवासला धरण परिसरात संयुक्त पाहणी करत तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

खडकवासला धरण चौपाटी परिसरात मुख्य पुणे-पानशेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाहने उभी करुन हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरतात. पर्यटकांच्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो व परिणामी वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत इतर पर्यटकांचे तर हाल होतातच शिवाय स्थानिकांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. तसेच हजारो पर्तटक थेट पाण्यात उतरत असल्याने पाण्याचेही मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते.

सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व लाखो पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा याबाबत सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी पुढाकार घेत तातडीने याबाबत उपाययोजना करण्यासाठी इतर विभागांसोबत एकत्रित पाहणी केली. यावेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले,

पुणे ग्रामीण पोलीस जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक शेळके, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, खडकवासला धरण शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर, वनपाल वैशाली हाडवळे, वनरक्षक बाळासाहेब जिवडे व चौपाटीवरील विक्रेते उपस्थित होते.

तातडीने होणार या उपाययोजना...

•धरणात उतरण्याच्या वाटा बंद करण्यात येणार.

•पाण्यात उतरणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे माहिती फलक लावण्यात येणार.

•चौपाटी परिसरात रस्त्याच्या एकाच बाजूने वाहनं उभे करण्याचे नियोजन.

•विक्रेत्यांच्या हातगाड्यांसमोर बांबूचे कुंपण करण्यात येणार.

•धरण चौकापासून पुढे चौपाटी संपेपर्यंत रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात येणार.

•वाहने वळविण्यासाठी डिआयएटी जवळ व्यवस्था करण्यात येणार.

•सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

"सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह खडकवासला धरण परिसरात संयुक्त पाहणी करून तातडीने काही उपाययोजना करण्याचे ठरले आहे. येत्या रविवारी याबाबत अंमलबजावणी झालेली दिसेल. तसेच दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पुणे महापालिका, पाटबंधारे विभाग व वन विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येणार आहे."

- भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण.

टॅग्स :Pune NewsTraffic