उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

  • पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख ः ३१ मे
  • संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ः १५ जून

अर्ज पाठवण्याचे ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडून आवाहन

पुणेः दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने वार्षिक शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागवले आहेत. फाउंडेशनतर्फे पंचावन्न भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते.

देशाबाहेरील विद्यापीठ वा संशोधन संस्थेकडून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळालेले पदवीधर, भारतीय विद्यार्थी किंवा २०१५ अथवा त्यापूर्वी भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये पीएचडीसाठी संशोधन करण्यासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या रकमेची परतफेड दोन वर्षांत करावयाची असते.

वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश दिल्याबद्दलच्या पत्राची छायांकित प्रत व स्वतःचा पत्ता लिहिलेल्या ११ सें.मी. बाय २४ सें.मी. आकाराच्या पाकिटावर १० रुपयांचे टपाल तिकीट लावून ते ‘कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे- ४११ ००२’ या पत्यावर पाठवावे. विनंतीपत्र पाठविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जाचा नमुना इतर जोडपत्रांसह ३१ मेपर्यंत पाठविला जाईल किंवा ‘सकाळ’च्या ५९५, बुधवार पेठ, पुणे येथील कार्यालयात सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रत्यक्षात देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे संपूर्ण भरलेले अर्ज १५ जूनपर्यंत ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयात स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क - (०२०) २४४०५८९४/९५/९७. ई-मेल -sakalindiafoundation@esakal.com.

Web Title: sakal india foundation and student scholarships