राज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या सुरू केल्या आहेत. 

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी दोन शिष्यवृत्त्या सुरू केल्या आहेत. 

महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जांमधून फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीची निवड करेल. विद्यार्थ्यांनी मार्च २०१८ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत (बारावी) ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह अभियांत्रिकी, दंतचिकित्सा, वास्तुविशारद किंवा नर्सिंग तसेच विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्‍यक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या दिल्या जातील.
पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज ‘सकाळ’च्या ५९५, बुधवार पेठ, शनिवारवाड्याजवळ, पुणे येथील ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कार्यालयातून दहा दिवसांच्या आत समक्ष येऊन घ्यावेत. पूर्ण भरलेले अर्ज ‘सकाळ’च्या कार्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. फाउंडेशनचे कार्यालय रविवार व सरकारी सुट्यांचे दिवस वगळून रोज सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत सुरू असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क = ०२०-२४४०५८९५, २४४०५८९७ किंवा २४४०५८९४.  

Web Title: Sakal India Foundation Police Child Scholarship