मनापासून कष्ट करा, यश मिळेल - प्रतापराव पवार

Sakal-India-Foundation
Sakal-India-Foundation

पुणे - ‘‘गरज ओळखून पर्याय शोधतात ते यशस्वी होतात. आमच्या पिढीची आव्हाने आणि आजच्या तरुण पिढीची आव्हाने निराळी आहेत. आजच्या तरुणांना करिअरच्या दृष्टीने मोठ्या संधीदेखील उपलब्ध आहेत. मनापासून कष्ट करा, यश निश्‍चितच मिळेल, मात्र समाजाला विसरू नका. कर्तव्य समजून निःस्पृहपणे मदत करण्यासाठी जाणीव ठेवून भारतात पुन्हा या. कारण येथेही भरपूर संधी आहेत.’’ असा सल्ला ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी चाललेल्या विद्यार्थ्यांना दिला. 

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फाउंडेशनतर्फे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, फिनलॅंड यांसारख्या देशांत उच्च शिक्षणासाठी निघालेल्या ५१ विद्यार्थ्यांना २०१८-१९ या वर्षाकरिता प्रत्येकी सत्तर हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

फाउंडेशनचे विश्‍वस्त एस. पद्मनाभन, कार्यकारणीचे सदस्य भाऊसाहेब जाधव आणि सचिव डॉ. अरुणकुमार कालगावकर उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मी कसा आहे, माझा देश कसा आहे, याचे आकलन परदेशात गेल्यावर होईल. अनेक प्रश्‍नांची उत्तरेही तुम्हाला मिळतील. अनेक आव्हाने येतील. मात्र आपले आई-वडिल व शिक्षकांच्या कष्टाची जाणीव ठेवा. तेथील शिक्षणाचा सर्वोत्तम उपयोग करून घ्या. आपल्या देशात करिअर घडविण्यासाठी परत या आणि तुमच्या ज्ञानाचे समाजाला योगदान द्या.’ जाधव यांचेही भाषण झाले.

एक लाख रुपये शिष्यवृत्तीचा मानस
सकाळ इंडिया फाउंडेशन पुढील वर्षी (२०१९-२०) हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. या निमित्ताने समाजाच्या दातृत्वावर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा मानस आहे, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव डॉ. कालगावकर यांनी दिली.

मी इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. अमेरिकेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इलेक्‍ट्रिकल्स या विषयात मास्टर्स डिग्री करण्यासाठी मी जात आहे. माझे हे शिक्षण विशेषत्वाने वैद्यकीय क्षेत्रासाठी आहे. 
- निकिता काकडे

मी इंडस्ट्रियल अँड इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. डिग्री घेतली आहे. अमेरिकेत ह्युस्टन विद्यापीठात सिस्टीम इंजिनिअरिंग या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी मी जात आहे. बिझनेस इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या विषयात करिअर करण्याच्या भरपूर संधी आहेत. 
- अभिषेक शेळके

 मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. मला ‘आर्टिफिशिअल इंटिलिजन्स’ या विषयात करिअर करायचे आहे. त्यासाठीच मी राँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (यूएसए) येथे चाललो आहे. तेथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी संपादन करून रोबोट्‌स, (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स), हवामानाचा अंदाज (वेदर प्रेडिक्‍शन), मशिन लर्निंगमध्येही करिअरच्या संधी आहेत. 
- चिन्मय काळे 

मी बायो टेक्‍नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग केले. या विषयात मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिली आले. पेन्सिलवेनिया स्टे युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेक्‍नॉलॉजी विषयात मला मास्टर्स डिग्री घ्यायची आहे. दीड वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. भारतात येऊन मधुमेहासंबंधीचे मला संशोधन करायचे आहे.
- सोनिया ताम्हनकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com