‘सकाळ’च्या पुढाकाराने मोहीम ‘आनंदी पुणे, निरोगी पुणे’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पुण्याच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या "सकाळ'ने याबाबत विचार करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात या मोहिमेची माहिती देण्यात आली. 

पुणे - पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या आरोग्यापासून ते वाहतुकीपर्यंतच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ ‘आनंदी पुणे, निरोगी पुणे’ मोहीम राबविणार आहे. त्याची सुरवात २२ डिसेंबरला होणाऱ्या अर्धमॅरेथॉनपासून होणार असून, येत्या पाच वर्षांमध्ये विविध उपक्रम राबविले जातील. 

पुण्याच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ‘सकाळ’ने याबाबत विचार करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात या मोहिमेची माहिती देण्यात आली. 

या बैठकीस ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, खासदार गिरीश बापट, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, पीएमआरडीचे आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता-महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, वाहतूक तज्ज्ञ प्रसन्न पटवर्धन तसेच प्रांजली आगाशे, निवृत्त नगररचना अधिकारी रामचंद्र गोहाड, रेल्वेविषयक तज्ज्ञ दिलीप भट तसेच विवेक खरे, ‘परिसर’चे प्रकल्प संचालक रणजित गाडगीळ, ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’चे हर्षद अभ्यंकर आदी उपस्थित होते. 

पुणेकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, तसेच सर्वसामान्य पुणेकरांनी पुढाकार घेऊन एकदिलाने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करण्याची ‘सकाळ’ची तयारी आहे. पुणेकरांनी आनंदी आणि निरोगी बनले पाहिजे, यासाठी या व्यासपीठावरून प्रयत्न करण्यात येतील. पुणेकरांचे आरोग्य सुधारावे, याकरिता येत्या पाच वर्षांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन २२ डिसेंबरला करण्यात येणार असून, त्यात अधिकाधिक पुणेकरांनी भाग घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. 

पुण्याची वाहतूक सुधारली तरच प्रदूषण कमी होऊन पुणेकर निरोगी होतील. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक यंत्रणेतही सुधारणा करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातील. पुण्याच्या वाहतुकीत सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण वाढण्याची गरज या वेळी प्रतिपादित करण्यात आली. वाहतूक या पुण्यापुढील प्रमुख समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पीएमपी, पुणे महापालिका आणि सर्व पुणेकरांच्या साथीने ‘सकाळ’ने ‘बस डे’चे आयोजन नोव्हेंबर २०१२ मध्ये केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी पीएमपी अधिक मजबूत करण्याची गरज त्यातून स्पष्ट झाली. आता यापुढील काळात त्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. 

आरोग्य, वाहतूक या प्रश्‍नांबरोबरच पुणेकरांसमोरील सामाजिक-आर्थिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्नही ‘सकाळ’ भविष्यकाळात करेल. यासाठी विविध क्षेत्रांतील व्यक्ती तसेच नागरिकांच्या बैठका ‘सकाळ’ आयोजित करणार असून, आजची बैठक ही त्यातील पहिली बैठक होती.
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, ‘सकाळ’

सहभागी पुणेकरांची मते

गिरीश बापट
    बससाठीच्या जागांबाबत मार्ग काढण्यात येईल.

प्रसन्न पटवर्धन
    हिंजवडीमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरातील आयटी कंपन्यांच्या अंतर्गत वाहतुकीसाठी एकच यंत्रणा उभारावी

शिरीष पोरेडी
   ‘एचसीएमटीआर’साठी पुणे आणि पिंपरीचा मार्ग जोडण्यासाठी एका पुलाची गरज

रूबल आगरवाल
   ‘एचसीएमटीआर’साठी पुलाच्या सूचनेचा विचार करू

प्रांजली आगाशे 
    पुण्याच्या वाहतुकीचा सर्वांगीण वाहतूक आराखडा (सीएमपी) कागदावरच.
    सार्वजनिक वाहतुकीची अपुरी यंत्रणा 
    मूळ उद्देशापासून भरकटलेले एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (पुमटा)
    पुण्याच्या वाहतूक समस्येवरील उपाय कालबद्धरीतीने योजण्याची व चर्चा होण्याची गरज

अजय चारठणकर 
    बससंख्या वाढल्यानंतर त्यासाठी आगारांची जागा लागेल. 
    पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास केल्यास ४०० बसगाड्यांची गरज भागेल
    जागांबाबत पुणे महापालिका परवानगी देत नाही

सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण वाढविणे गरजेचे
पुण्याच्या वाहतुकीत सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण सध्या २० टक्के असून, ‘सीएमपी’नुसार ते २०३१ पर्यंत ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढविणे अपेक्षित आहे. खासगी वाहतूक ४७ टक्‍क्‍यांवरून १० टक्‍क्‍यांपर्यंत कमी करणे; तर चालणे आणि सायकलिंगचे प्रमाण ३३ टक्‍क्‍यांवरून ५० टक्‍क्‍यांपर्यंत नेणे अपेक्षित आहे. त्यासाठी योग्य ती पावले पडताना दिसत नाहीत. तसेच पुण्याच्या सध्याच्या लोकसंख्येनुसार रस्त्यावर पीएमपीच्या ३८०० बसगाड्या अपेक्षित असताना सध्या केवळ १५०० बसगाड्याच आहेत. बीआरटी योजना आतापर्यंत १२० किलोमीटरच्या रस्त्यांवर होणे अपेक्षित असताना केवळ ८ किलोमीटर अंतरावरच ती थांबली आहे. शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्ता म्हणजे ‘एचसीएमटीआर’ आता मार्गी लागला असला तरी तो पूर्णपणे सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव ठेवणे अपेक्षित होते. मात्र त्यातील चार पदर खासगी वाहनांसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘एचसीएमटीआर’ला तो जोडण्यात आलेला नाही, आदी मुद्यांचाही बैठकीतील सादरीकरणात समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Media Group will be launching a campaign to solve various problems of Pune