पिंपळे सौदागरचा रस्ता चकाचक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

"सकाळ'मध्ये "चिखलामुळे आयटीयन्स बेजार' असे वृत प्रसिद्ध झाले. त्याची पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाने दखल घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केली. 

नवी सांगवी  - पिंपळे सौदागर येथील पावसामुळे चिखलमय झालेला बीआरटी रस्ता महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 1) जेसीबी लावून स्वच्छ केला. पी. के. चौकापासून लिनियर गार्डन दरम्यानच्या रस्त्यावरील चिखल साफ करण्याचे काम दिवसभर सुरू होते. 

पिंपळे सौदागरमधील बीआरटी रस्त्यामुळे पुणे-मुंबई व नाशिक महामार्ग यांना जोडला आहे. शिवाय, या परिसरात राहणाऱ्यांमध्ये नोकरदारांसह आयटीयन्सची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रस्त्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, पी. के. चौक ते लिनियर गार्डन दरम्यान बीआरटी रस्त्यावर चिखल पसरला होता.

या गार्डनच्या एका भागातून काही खासगी जडवाहनांचीही वाहतूक सुरू असते. या वाहनांच्या चाकाला लागलेला चिखलही बीआरटी रस्त्यावर पसरतो. त्यात पावसाची भर पडते. परिणाम रस्ता निसरडा होऊन वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही धोकादायक ठरत होता. या बाबत शुक्रवारी (ता. 1) "सकाळ'मध्ये "चिखलामुळे आयटीयन्स बेजार' असे वृत प्रसिद्ध झाले. त्याची पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाने दखल घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केली. 

चिखलामुळे आयटीयन्स बेजार

अशी हालली सूत्रे 
"सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे व नगरसेवक बापू काटे यांनी सहायक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ठेकेदाराशी संपर्क साधून रस्त्यावरील गाळ उचलायला सांगितले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत जेसीपी घटनास्थळी पोचला व रस्त्याची साफसफाई सुरू झाली. जेसीबीच्या साह्याने चिखल गोळा केल्यानंतर बीआरटी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रस्ता झाडून स्वच्छ केला. 

राडारोड्याची विल्हेवाट लावा 
बीआरटी रस्त्याबरोबरच स्वराज चौक, मिथिलानगरी शेजारील भूखंडावर आणून टाकलेल्या राडारोड्यामुळे परिसराला बकालपणा आलेला दिसतो. त्यामुळे त्या राड्यारोड्याचीही संबंधितांनी विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news impact pimple saudagar