पकडलेल्या चोरीची शिक्षा नागरिकांनाच!

पकडलेल्या चोरीची शिक्षा नागरिकांनाच!

पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. दरम्यान, महापालिकेचे सर्व टॅंकर सुरू असून, पाणीपुरवठा सुरळीत आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेता पुणेकरांना एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात अनेक भागांत अपुरा आणि अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही भागांत चार-चार दिवस पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून खासगी टॅंकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे टॅंकरचालकही चढ्या भावाने पाण्याची विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे.

कालव्यातून पाणी चोरी होत असल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले. त्यामुळे कारवाईच्या भीतीने पॉइंटमालकांनी ते बंद केले. त्यामुळे या पॉइंटवरून टॅंकर भरून वाटेल त्या किमतीला पाणी पुरविणाऱ्या खासगी टॅंकरमालकांचे टॅंकर बंद पडले. परिणामी धायरी आणि परिसरातील नागरिकांना खासगी टॅंकर आणि महापालिकेकडून देखील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. 

दरम्‍यान, ज्या भागात  टॅंकरची मागणी आहे; तेथे पुरविले जात असल्याचे  पाणीपुरवठा विभाग प्रमुख  व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

वीजचोरीप्रकरणी एकावर गुन्हा
कृषिपंपाचा वापर पाण्याचे टॅंकर भरण्याच्या व्यावसायिक कारणासाठी करून वीजचोरी केल्याप्रकरणी वडगाव धायरी परिसरातील रायकरनगरमधील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी महावितरण कंपनीच्या भरारी पथकाच्या साहाय्यक अभियंता सारिका चाळक यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राजाभाऊ राघू रायकर (रायकरनगर, वडगाव धायरी) यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणचे भरारी पथक रायकर यांच्या कृषिपंपाचे वीजमीटर व वीजजोडाची तपासणी करण्यासाठी गेले, त्या वेळी रायकर हे कृषिपंपासाठी घेतलेल्या वीजमीटरचा उपयोग महावितरण कंपनीची परवानगी न घेता पाण्याचे टॅंकर भरण्याच्या व्यावसायिक कारणासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने वीजमीटरसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यावर नोटरीची सही आणि रजिस्टरमध्ये नोंद नसल्याचे आढळले. रायकर यांनी अनधिकृतपणे कृषिपंपाच्या वीजमीटरचा वापर पाण्याच्या टॅंकरसाठी म्हणजेच व्यावसायिक कारणासाठी केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मागील दोन वर्षांत महावितरणची ८१ हजार १९४ युनिट म्हणजेच अठरा लाख रुपये किमतीची वीजचोरी केली.

आणखी दोघांचा भांडाफोड
धायरी आणि परिसरात कालव्यातून पाणी व वीजचोरी करून खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणाऱ्या (पॉइंटमालक) दोघांवर कारवाई झाली असली, तरी असे आणखी दोन म्हणजे एकूण चार जण असल्याची माहिती नव्याने समोर आली आहे. गेली अनेक वर्षे बेकायदा सुरू असलेल्या या पॉइंटमालकांवर पाटबंधारे खाते, महावितरण आणि महापालिका यांच्याकडून दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

धायरी येथे कालव्याला भगदाड पाडून पाइपने पाणी चोरून विहिरीत आणले जाते. त्या विहिरीतून टॅंकर भरून परिसराला पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी विजेची चोरीदेखील होत असल्याचे  प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते.  शेतीपंपाच्या नावाखाली टॅंकर व्यवसायासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे दोन प्रकार घडकीस आले होते. अधिक चौकशी केल्यानंतर अशा प्रकारे सहा ते सात ठिकाणी पॉइंट असून, त्यापैकी एकट्या धायरी परिसरात चार असल्याचे टॅंकरचालकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, टॅंकर भरणे बंद झाल्यामुळे टॅंकरमालकांनी आज जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘आम्हाला टॅंकर भरण्यासाठी पॉइंट उपलब्ध करून द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. हे सर्व खासगी टॅंकरमालक आहेत. त्यांना पॉइंट उपलब्ध करून देता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितल्याचे काही टॅंकरमालकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पाणी आणि वीजचोरी करून संबंधित पॉइंटमालक जर लोकांची अडवणूक करणार असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मालकांच्या विहिरी आणि टॅंकरचालकांचे टॅंकर अधिग्रहण करावेत. दुष्काळी परिस्थितीत अशा स्वरूपाची कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत. तसेच, महापालिकेनेदेखील अशा टॅंकरचालकांना काळ्या यादीत टाकावे.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com