शाळा सुरू ! मुलांची अन आईबाबांचीही...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

आदल्या दिवशीच्या जोरदार पावसानंतर गुरुवारची पुणेकरांची सकाळ काहीशी धीम्या गतीने सुरू होईल असं वाटत असतानाच; प्रत्यक्षात मात्र अवघ्या शहराला एक वेगळीच लगबग लागून राहिली असल्याचं पाहायला मिळालं. शहरभर सर्वच रस्त्यांवर, त्यातही मध्यवर्ती पुण्यात तर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.

पुणे- आदल्या दिवशीच्या जोरदार पावसानंतर गुरुवारची पुणेकरांची सकाळ काहीशी धीम्या गतीने सुरू होईल असं वाटत असतानाच; प्रत्यक्षात मात्र अवघ्या शहराला एक वेगळीच लगबग लागून राहिली असल्याचं पाहायला मिळालं. शहरभर सर्वच रस्त्यांवर, त्यातही मध्यवर्ती पुण्यात तर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.

या गर्दीत दिसत होत्या 'रिक्षावाल्या काकांच्या' रिक्षा... पिवळ्याधमक् रंगाच्या स्कुलव्हॅन... सोबतीला खूपशा चारचाकी-दुचाकी... अन या सगळ्यांतून हळूच डोकावत असणाऱ्या रंगीबेरंगी वॉटर बॅग्स, नवीकोरी आडवी-उभी दप्तरं, लाल-निळे-हिरवे-किरमिजी गणवेश, बूट-मोजे, टोपी, रेनकोट, कंपास... आणि हे सगळं सांभाळत आपल्या नव्या 'मोहिमेवर' निघालेले असंख्य चिमुकले 'शिपाई' आणि अर्थातच त्यांचे आईबाबा !...

एव्हाना 'शाळा सुरू' या दोनच शब्दांचं हे सारं वर्णन होतं हे वाचणाऱ्यांच्या लक्षात आलंच असेल. तर हो, गुरुवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या रस्त्यारस्त्यांवर आणि शाळाशाळांत हे असंच दृश्य काहीसं पाहायला मिळत होतं. अनेक चिमुकले आपल्या उण्यापुऱ्या तीन-साडेतीन वर्षांच्या आयुष्यातला पहिलाच शाळेचा दिवस अनुभवायला घाबरतघुबरत सज्ज होऊ पाहत होते, तर त्यांचे कित्येक मोठे दादा-ताई मोठ्या उत्सुकतेने आपल्या पुढच्या इयत्तेच्या वर्गात बसायला आपल्या मित्रकंपनी सोबत अगदी लवकर येऊन थांबले होते. अर्थात, रडूनरडून डोळे आणि गाल लालबुंद झालेल्या छोटुकल्यांना धीर द्यायला त्यांचे आईबाबा, आज्जीआजोबा हेही मोठ्या जबाबदारीने आपली जागा लढवत होते. त्यामुळे पहिला दिवस हा मुलांइतकाच त्यांचाही होता.

लहान मुलांना भीती वाटावी, एकेकटं वाटावं, अशा एकेकाळच्या वातावरणातून अलीकडच्या शाळा कधीच बाहेर पडल्या आहेत, हे अगदी जाणवून यावं अशी देखणी सजावट आणि मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी अनेक शाळांमध्ये केल्याचं दिसून आलं. एक उत्साही आणि उत्सवी वातावरण सगळीकडेच जाणवून येत होतं. प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळेचा पहिला दिवस हा त्याच्यासाठी अविस्मरणीय असाच ठरावा, असं जणू प्रत्येकच शाळेने आणि शिक्षकांनी ठरवलं होतं. त्यामुळे मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी शाळांमध्ये पाहायला मिळाल्या. मुलांना शाळेत सुद्धा घरीच असल्यासारखं वाटावं यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न घेताना दिसत होते.

भेटीला नवे फळे, छोटा भीम आणि फुगे !
शाळेत आल्याआल्या विद्यार्थ्यांची कळी चटकन खुलावी म्हणून अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताला फुलांची, रंगेबेरंगी फुग्यांची सजावट सज्ज होती. वर्गावर्गांच्या बाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आवारातले सुचनाफलक सुद्धा काळीतुकतुकीत अशी नवी नव्हाळी घेत रंगीत खडूंच्या सूचना आपल्यावर मिरवत असल्याचं दिसत होतं. अनेक शाळांत तर 'छोटा भीम'सारख्या मुलांच्या आवडत्या निरनिराळ्या कार्टून कॅरेक्टरची मोठी पोस्टर्स स्वागताला उभी करण्यात आली होती ! काही ठिकाणी छान गाणी आणि संगीत कानांवर येत होतं. मुलांना शाळेत असताना मज्जा वाटावी म्हणून अनेक प्रकारची खेळणी, सायकली, छोट्या घसरगुंड्या आणि चित्रांनी भरलेली पुस्तकं सुद्धा ठेवण्यात आली होती.

Web Title: Sakal news pune news school maharashtra first day