#SakalPositive उद्योगनगरीतील भूमीपुत्र पुन्हा दुग्धव्यवसायाकडे

#SakalPositive उद्योगनगरीतील भूमीपुत्र पुन्हा दुग्धव्यवसायाकडे

पिंपरी - गावांचे रूपांतर महानगरात होत असताना भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या, शेती संपली, पशुधन संपले, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शेती-मातीतील ग्रामसंस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती रुजली. २५-३० वर्षांत बदलेलं शहराचं हे चित्र आता पुन्हा पालटू लागलं आहे. भूमिपुत्र पुन्हा पशुधन आणि दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. समाविष्ट गावांत गोठे सजू लागली आहेत. कुणी रोजगाराचे साधन म्हणून, कुणी छंद म्हणून तर कुणी केवळ समाजसेवा म्हणून...

पवना नदीच्या काठावर आमची बागायती शेती होती. २० वर्षांपूर्वी गाव महापालिकेत समाविष्ट झाले. हळूहळू शेती कमी होत गेली. तीन गायी व पाच म्हशी होत्या. चारा मिळेनासा झाल्याने त्या विकाव्या लागल्या. केवळ घरासाठी एक गाय ठेवली. आता शहरीकरण झाले आहे. घरी गाय असल्याने अनेकांकडून गायीच्या दुधाची मागणी वाढली आणि गायी घेण्याचे ठरविले. गेल्या वर्षभरात १४ गीर गाई घेतल्या. आता रोज ५० लिटर दूध निघते.   घरी येऊन घेतल्यास ७० रुपये व घरपोच दिल्यास ९० रुपये लिटरप्रमाणे भाव मिळतो. तरीही मागणी वाढलेली असल्याने गायींची संख्या आणखी वाढविण्याचा विचार आहे, असे रावेत येथील शेतकरी तुकाराम भोंडवे यांनी सांगितले.  

पुण्यातील प्रसिद्ध कंत्राटदार व मूळचे शेतकरी असलेले बाळासाहेब रं. बहिरट यांनी लहान मुलांना गायीचे सकस दूध मिळावे, या इच्छेतून गायी घेतल्या आहेत. ते म्हणाले, ‘‘औंधमध्ये आमची ४० एकर शेती होती. शहरीकरणामुळे ३० वर्षांपूर्वी ती गेली. आम्ही वेगळा व्यवसाय निवडला; परंतु भेसळयुक्त दुधाचा मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहून गायी घेण्याचे ठरविले. रावेत परिसरात जागा घेऊन गोठा बांधला. तिथे आता शंभर गायी आहेत. पतंजली संस्थेच्या गोप्रेमी व्यक्तीमार्फत प्राधिकरण परिसरात दुधाचे वितरण केले जाते. गायींचा चारा, गोठा, देखभाल यांचा खर्च परवडत नसला तरी केवळ मुलांना सकस दूध मिळते आहे, हेच मोठे भाग्य आहे.’’

इथे आहेत गोठे
पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, ताथवडे, पुनावळे, रहाटणी, रावेत, किवळे, मामुर्डी, तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली, भोसरी, मोहननगर, वाल्हेकरवाडी, दिघी, जाधववाडी, कासारवाडी.

दुधाला मागणी वाढल्याने मोहननगरमधील गवळी बांधवांनी गायी-म्हशींची संख्या काही प्रमाणात वाढविली आहे. मागणीमुळे भावही वाढला आहे. पशुखाद्याचे भाव वाढल्याने दुधाचा व्यवसाय परवडत नाही. त्याकडे काही जण जोडधंदा म्हणून पाहतात. 
- नारायण बहिरवाडे, शिवतेजनगर, चिखली

सकारात्मक आणि ऊर्जा देणारे खूपकाही आसपास घडत असते. ही विधायकता वाचकांसमोर मांडण्याची ‘सकाळ’ची भूमिका सातत्याने राहिली आहे. आजच्या अंकामध्ये ‘विधायक’ विषय जरूर वाचा. अशी विधायकता आपल्या दृष्टीसमोर असेल, तर आवर्जून आम्हाला कळवा webeditor@esakal.com वर. शिवाय, फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला टॅग करा #SakalPositive या हॅशटॅगद्वारे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com