वाचकांच्या हाती ‘लोकयात्रे’चा दस्तावेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal publication Dr Sadanand More written book Lokyatra of Maharashtra pune

वाचकांच्या हाती ‘लोकयात्रे’चा दस्तावेज

पुणे : महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा, डॉ. सदानंद मोरे लिखित ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ बृहद ग्रंथ ‘सकाळ’ प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. वाचकांना या ग्रंथाचा लाभ घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ प्रकाशनाकडून या ग्रंथावर ४० टक्के प्रकाशनपूर्व सवलत देणार आहे. या सवलतीचा लाभ २० मे पर्यंत घेता येईल.

प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, समाजसुधारक, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा आढावा ज्येष्ठ साहित्यिक-अभ्यासक-संशोधक डॉ. मोरे यांनी या ७५० पानी लेखनातून घेतला आहे. सध्या विषमता, अन्यायाचे निर्मूलन करणाऱ्या चळवळी थंडावल्या आहेत का? असल्या तर का? याविषयी सखोल मांडणी अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथात केली आहे.

कार्यकर्तृत्वाचा आढावा

धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राच्या या कार्यकर्तृत्वाचा सर्वंकष आढावा डॉ. मोरे यांनी लेखनामधून घेतला आहे. डॉ. मोरे हे संयत आणि सुलभ मांडणी करणारे भाष्यकार म्हणून वाचकांना परिचित आहेत. ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये १९९४ पासून लिहिलेल्या सदरलेखांच्या माध्यमातून त्यांनी ही मांडणी केली आहे. त्यातून चार बृहद् ग्रंथ आकाराला आले.

हा ग्रंथ कोणासाठी?

महाराष्ट्राची जडणघडण, संस्कृती, भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण यांपैकी कोणत्याही क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विषयांचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, धोरण ठरवणारे सत्ताधारी, सनदी अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांच्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ ग्रंथाविषयी

महाराष्ट्र हा द्रष्ट्या राज्यकर्त्यांसोबतच संत, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही घडवला. स्वार्थासाठी सामाजिक प्रगतीमध्ये अडथळा आणणारी प्रतिगामी माणसेही तसेच, चुकीच्या रूढी पुसून समाजाला पुढे नेणारी माणसेसुद्धा समाजात जन्माला येतात. अशा सर्वांचा वेगवेगळ्या धर्म तत्त्वज्ञानाचा आढावा घेतला आहे. वारकरी, महानुभाव, लिंगायत आदी पंथ संस्थापक आणि त्यांचे विचार; महात्मा फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, नरेश सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी अशा थोरांमोठ्यांच्या कार्यासोबतच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाचीही नोंद डॉ. मोरे यांनी घेतली आहे.

Web Title: Sakal Publication Dr Sadanand More Written Book Lokyatra Of Maharashtra Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewspuneBook
go to top