‘सकाळ रिलीफ फंडा’ला यंदाचा ‘कारगिल गौरव’ पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

अनेक आपत्तींच्या काळात या राज्याला मदत करणाऱ्या ‘सकाळ रिलीफ फंडा’ला यंदाचा ‘कारगिल गौरव’ पुरस्कार जाहीर झाला.

पुणे - कारगिल युद्ध असो की जम्मू-काश्‍मीरमधील पूरस्थिती, अशा अनेक आपत्तींच्या काळात या राज्याला मदत करणाऱ्या ‘सकाळ रिलीफ फंडा’ला यंदाचा ‘कारगिल गौरव’ पुरस्कार जाहीर झाला. याबरोबरच दशरथ जाधव, काचो अहमद खान आणि पत्रकार राखी बक्षी यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘सरहद’ संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे माजी प्रमुख आणि सर्जिकल स्टाइकचे नेतृत्व केलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा, अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक राकेश भान यांच्या उपस्थितीत २३ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार प्रदान केले जातील. 

निवृत्त लेफ्टनंट जनरल मोती धर आणि रवी दास्ताने यांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे ‘सरहद’चे संजय नहार आणि संजीव शहा यांनी सांगितले. ग्रामीण भागात जनावरांना चारावाटप आणि पाणीपुरवठा या समाजकार्यासाठी, खान यांनी काश्‍मिरात पारंपरिक सौरऊर्जेसाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि बक्षी यांनी पत्रकारिता क्षेत्राला दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे. या कार्यक्रमात कारगिलवर देशात प्रथमच तयार केलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करणार असल्याचे शहा म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Relief Fund announces this year's Kargil Gaurav Award