‘मावडी-सुपे’ने दाखविला समृद्धीचा मार्ग

mavadi-supe
mavadi-supe

पुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती आणि कृतिशीलतेची जोड मिळाल्याने ही चळवळ गावात कायमस्वरूपी विस्तारत राहिली. साहजिकच त्याने दुष्काळात टॅंकरचे पाणी पिणाऱ्या गावांत ऐन उन्हाळ्यात नद्या, ओढ्यात पाणी खेळू लागले, विहिरींना पाणी राहिल्याने बागायतीचे क्षेत्र विस्तारले. 

खोलीकरण, गाळ काढणे, रुंदीकरण, सरळीकरण, पंप आणि बंधारा दुरुस्ती, बंधारे बांधणे इत्यादी कामे ‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून हाती घेतली. ग्रामसभेच्या पूर्वसंध्येला गावातील महिलांच्या सभेत तनिष्का सदस्यांनी जलसंधारणाचा विषय मांडून पाणीप्रश्‍नावर चर्चा घडवली. दुसऱ्या दिवशीच्या ग्रामसभेत गावकारभाऱ्यांनी, ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिला. ग्रामसभेत ठराव झाले. सकाळची मदत, मार्गदर्शन घेण्याचे ठरले. अशा पद्धतीने जलसंधारणाच्या कामात पुढे येणाऱ्या प्रत्येक गावाला ‘सकाळ रिलीफ फंडा’ने दोन लाखांची मदत दिली. गावकऱ्यांनी तेवढाच वाटा; तर काही ठिकाणी तर ‘सकाळ’च्या दोन लाखांत गावकऱ्यांनी दहा लाखांपर्यंत स्वतःची रक्कम जमा केली. श्रमदान झाले. कोणी जेसीबी मोफत दिले, तर कोणी काम करणाऱ्यांच्या चहापान-भोजनाची व्यवस्था केली. सारा गाव झपाटून जलसंधारणात गुंतून गेला. निर्धारित वेळेत काम झाल्याने पावसाळ्यात बहुतांश गावांतील जलस्त्रोतांमध्ये पुरेसा साठा झाला. गावकऱ्यांचा उत्साह दुणावला. काही गावांनी त्यानंतर अनेक संस्था-संघटनांच्या मदतीने साखळी बंधाऱ्यांची संख्या वाढविली.

जमीनही बनली सुपीक
जलसंधारणाच्या कामातून नद्या, ओढा, नाल्यातून निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेला. त्यांनी तो मुरमाड, पडीक जमिनीत टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढली. वहिवाटी खालील जमिनीचे प्रमाण वाढले.

अबब! किती मोठे काम
‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करीत असताना पारदर्शकता, परिणामकारक कार्यपद्धती यांचा अवलंब केला जातो. सरकारी यंत्रणेकडून कामाच्या अंदाजपत्रकाची खातरजमा केली जाते आणि प्रत्यक्षात काम झाल्यानंतर ते तेवढ्या रकमेचे आणि त्या आकाराचे झाले की नाही, हे तपासून घेतले जाते. अनेकदा, दिलेल्या रकमेच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक काम यातून झाल्याचे निदर्शनाला येते. याला जबाबदार असतो तो लोकसहभाग आणि गावकऱ्यांचा उत्साह. त्यांच्या सहभागाने मोठे काम कमी खर्चात उभे राहिल्याचे निदर्शनाला आले आहे.

घडले सुखद बदल
जलसंधारणाचे काम करताना ओढ्यांवर अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, या कामात सारा गाव जुंपल्याने ही अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून घेतली अन्‌ ओढ्या-नाल्याचे क्षेत्र मोकळे झाले. यानिमित्ताने काही ठिकाणचे वर्षानुवर्षांचे हद्दीचे तंटेही निकाली निघाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com