‘सकाळ साप्ताहिक’चा पुस्तक दिन विशेषांक आज प्रसिद्ध होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

बदलत्या वाचनसंस्कृतीचा वेध

पुणे: बदलत्या काळानुसार वाचन संस्कृतीमध्येही बदल होत आहेत. वाचनाची माध्यमे, जागा बदलत आहेत. पुस्तकांच्या जागी बऱ्याच प्रमाणात ई- बुक्‍स आणि वाचनालयाच्या जागी बुक कॅफे आले आहेत. बदलणाऱ्या या वाचन संस्कृतीकडे नवे, जुने वाचक कसे बघतात? ते काय वाचतात? या सर्वांचा वेध घेणारा ‘सकाळ साप्ताहिक’चा ‘पुस्तक दिन विशेष अंक’ शनिवारी (ता. १५ एप्रिल) प्रसिद्ध होणार आहे.

जगप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार शेक्‍सपिअर यांचा २३ एप्रिल हा स्मृतिदिन जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. पुस्तक दिनाच्या निमित्ताने वाचनसंस्कृतीची चर्चा होणे अपरिहार्य आहे. ही वाचनसंस्कृती कशी अस्तित्वात आली. मानवाच्या प्रगतीबरोबर ती कशी बहरत गेली आणि भविष्यात या वाचनसंस्कृतीची वाटचाल कशी होणार आहे, याचा मागोवा घेणारा खास लेख अंकात आहे.

आजची पिढी वाचत नाही, ती पुस्तकांपासून दुरावली आहे, असा एक सार्वत्रिक आरोप आजच्या पिढीवर होत असतो. आजच्या पिढीच्या निवडक प्रतिनिधींनी ‘श्‍यामची आई’पासून रिचर्ड बाख, कोएलो काफ्का अशा नामवंत लेखकांची नावे त्यांच्या वाचन यादीत दिली आहेत. त्याचबरोबर वाचनाने एक नवीन जन्म अनुभवता येतो, स्वतःची विचारप्रणाली विकसित होते, अशा जाणिवाही यात व्यक्त झाल्या आहेत. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव सांगितले आहेत. वाचनप्रेमींनी एकत्र यावे, निवांत बसून वाचन करावे, साहित्याची चर्चा व्हावी, या उद्देशाने व्यावसायिकता पूर्ण बाजूला ठेवून सुरू करण्यात आलेल्या एका बुक कॅफेची गोष्टही अंकात आहे.

पुस्तकांचे गाव
महाबळेश्‍वर - पाचगणीजवळचे भिलार हे गाव महाराष्ट्र सरकारने ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित केले असून, १ मे रोजी या प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. काय आहे ही संकल्पना? कसा राबवला जाणार आहे हा उपक्रम? याची सविस्तर माहितीही अंकात आहे.

Web Title: sakal saptahik book day