लग्नात "व्हर्सेस' कोण आहेत? 

लग्नात "व्हर्सेस' कोण आहेत? 

पुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या "पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. 

अनाहूतपणे दोघेजण त्यांच्या घरात शिरले आणि "मुलाचं लग्न काढलंय,' हे त्यांचं वाक्‍य "पुलं'च्या कानावर आलं. त्यावर क्षणातच "लग्न ठरलं, तर "व्हर्सेस' कोण आहेत?' अशी त्यांनी गुगली टाकून, या वयातही विनोदबुद्धी जागृत असल्याचं दाखवून दिलं. या किश्‍श्‍यापासून पुलंची दुनिया उलगडत गेली. साहित्य, नाट्य, संगीत आणि चित्रपटांतून पुलं लोकांना भेटले; पण त्यांच्या प्रत्यक्ष सहवासातील खिळवून ठेवणारे अनुभव "पुल'प्रेमींना ऐकण्याची संधी मिळाली. 

"पुलं'प्रेमींची ही मैफल रंगली ती, "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या "अष्टपैलू खेळिया' या कार्यक्रमात. "पुलं'च्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. "पुलं'च्या जीवनावर आधारित "भाई' चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते महेश मांजरेकर, कलाकार सागर देशमुख, अश्‍विनी गिरी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी अनुभवलेले, वाचलेले आणि ऐकलेले "पुलं' रसिकांपुढे उलगडले. 

त्या वेळी हशा-टाळ्यांनी त्यांनी दाद दिली. "पुलं'च्या हास्यचित्रांसह ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांची दुर्मीळ छायाचित्रे पाहण्याचा आनंदही उपस्थितांनी घेतला. आलोक आणि कपिल घोलप यांनी ही चित्रे रेखाटली होती.  नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी विशेष सहकार्य केले. 

गोडबोले म्हणाल्या, ""व्यक्ती आणि वल्ली पुस्तकातील सर्वजण बुद्धिमान आहेत. त्यातील प्रत्येकाने विनोदाला कारुण्याचे अस्तर लावलेले आहे. त्यांच्या पात्रातून भविष्याकडे पाहण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे पुलंचे साहित्य अजरामर आहे.'' 

कुलकर्णी म्हणाले, ""पुलंच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्‍वास आणि निरागसता यांचा संगम दिसतो, त्यांची दृष्टी सौंदर्यशोधक होती. त्यांनी लोकांमधील शहाणपणा आपल्याकडे फिरकू दिला नाही, त्यामुळे त्यांना निरागसपणा आयुष्यभर जपता आला.'' 

""चित्रपटात पुलंची भूमिका साकारताना इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांचेच बोट धरून काम केले, ते योग्यच झाले,'' अशी भावना देशमुख यांनी मांडली. 

"भाई'तून पुन्हा पुलं उभे केले 
मला "पुलं'च्या साहित्याचा लवकर अभ्यास करता आला नाही. मात्र, ते इतरांकडून जाणून, अभ्यासून "पुलं'चा जीवनपट "भाई' या चित्रपटातून उभा केला आहे. वसंतराव देशपांडे यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले पुलंचे संबंध यातून कमालीचा माणूस दिसून आला. संपूर्ण "पुलं' समजून घेतल्यानंतर काय वगळावे, असा प्रश्‍न मला चित्रीकरणादरम्यान भेडसावत होता. चित्रपटाच्या प्रोसेसमध्येच मी बदललो, प्रत्येकातील गुडनेस जाणून घ्यायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे, असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com