‘सकाळ वसंतोत्सव’मध्ये पूरबायन चॅटर्जी यांच्या सतारवादनाने बहार

Vasantotsav
Vasantotsav

पुणे - सतारीतून ओथंबलेल्या अवखळ ‘पटदीप’च्या स्वरांत वसंतोत्सवाची आजची मैफील भिजली... वसंतरावांच्या आठवणीने गहिवरली... त्यांच्या सुरांच्या दौलतीच्या वर्षावाने सुखावलीदेखील... अन्‌ मनाच्या गाभाऱ्याला प्रसन्न करून गेली...

‘सकाळ’ने आयोजिलेल्या वसंतोत्सवाचे ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय रावेतकर ग्रुप, तर सहप्रायोजक चार्वी सारीज्‌ व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आहेत. ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज्‌, फूड पार्टनर मेहफिल केटरिंग सर्व्हिसेस व कम्युनिकेशन पार्टनर सेतू ॲडव्हर्टायझिंग आहेत. व्यवस्थापन व्हाइट कॉपर एंटरटेन्मेंट करीत आहेत.

वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात पूरबायन चॅटर्जी यांनी केली. पटदीप राग सादर करताना जोरकस तानकारी, मिंडकाम यातून या रागाच्या चंचल भावाचा स्वराविष्कार रसिकांसमोर उभा केला. रूपक आणि त्रितालबोलांशी स्वरांना खेळवत रागाची केलेली बहारदार बढत याला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली.

मैफलीच्या उत्तरार्धात राहुल देशपांडे आणि अन्य कलाकारांच्या स्वरांमधून ‘वसंतराव’ अवतरले. ‘वसंतराव ः एक स्मरण - कैवल्यगान’ यामध्ये शास्रीय संगीत, भावभक्ती, ख्याल, टप्पा, ठुमरी गझल अशा संगीताच्या विश्वात मुशाफिरी करणाऱ्या या अवलियाच्या प्रत्येक सांगीतिक अंगाला या कलाकारांनी आपला साज चढविला. कवी वैभव जोशी आणि स्पृहा जोशी यांच्या निवेदनातून वसंतराव यांच्या अनेक आठवणींचा पटही या वेळी उलगडला.

‘सावर रे ऐजय्यो’ या रचनेबरोबरच ‘प्रथम तुला वंदितो’, ‘शतजन्म शोधताना’ यांसह वसंतरावांची अनेक गाणी सादर करीत राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे यांनी निखिल फाटक (तबला), अमर ओक (बासरी), सारंग कुलकर्णी (सरोद), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), प्रसाद जोशी (पखवाज), उद्धव कुंभार (साइड रिदम), अनय गाडगीळ (की-बोर्ड) या कलाकारांच्या साथीने या शब्दसुरांच्या मैफलीत अनोखे रंग भरले आणि वसंतरावांच्या आठवणींच्या मैफलीचा हा कॅनव्हास व्यापून टाकला.

राहुल देशपांडे यांनी ‘मैं पतिया लिख भेजी’ ही बंदिश, ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद सतारवादक पूरबायन चॅटर्जी आणि सारंगीवादक दिलशाद खाँ यांच्या साथीने पेश केले. ‘घेई छंद’ वेळी या तिघा कलाकारांच्या जुगलबंदीतून मैफलीला उंचीवर नेत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com