शैक्षणिक शिदोरीची विद्यार्थ्यांना मेजवानी

शैक्षणिक शिदोरीची विद्यार्थ्यांना मेजवानी

पिंपरी -  चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे ‘सकाळ’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित आणि ‘दि युनिक ॲकॅडमी’ने सहप्रायोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ या दोनदिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. या प्रदर्शनात दुपारच्या सत्रात डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्‍चर प्रवेश प्रक्रिया’, प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी ‘इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. ललित वाधवा यांनी ‘व्होकेशनल कोर्स’बाबत माहिती दिली. तर, प्रा. संदीप पाटील आणि कांचन पाटील यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. 

‘आर्किटेक्‍चर’कडे वाढतोय कल
आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढत आहे. हा अभ्यासक्रम करण्यासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्‍चरच्या निकषानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी १० + २ असा नवीन अभ्यासक्रम गणित या विषयासह यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. अथवा ज्या विद्यार्थ्यांनी  १० + ३ असा पदविका अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुण मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, ते विद्यार्थी आर्किटेक्‍चरच्या प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र समजले जातात. ‘नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्‍चर’(नाटा) ही प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. 
- डॉ. महेंद्र सोनवणे

व्होकेशनल अभ्यासक्रम कौशल्य देणारा 
महाविद्यालयांमध्ये व्होकेशनल अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाचा म्हणावा तितका प्रचार आणि प्रसार झाला नाही. त्याबाबत बरेच गैरसमज पसरलेले आहेत. पारंपरिक शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर देते. व्होकेशनल अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्यपूर्ण आणि ज्ञानपूर्ण बनवले जाते. याचा फायदा म्हणजे हे विद्यार्थी वैयक्तिक स्तरावर अधिक कुशल आणि प्रशिक्षित होतात. 
- प्रा. ललित वाधवा

अभियांत्रिकीत भरपूर संधी
‘इंजिनिअरिंग क्षेत्रात बहुपर्याय उपलब्ध आहेत. सुरवातीच्या चार वर्षांत विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केल्यावर पुढील ४० वर्षे तुमची आरामदायी होतात. सध्या अभियांत्रिकीत भरपूर संधी आहेत. मात्र, त्यासाठी महाविद्यालय काळजीपूर्वक निवडणे आवश्‍यक असते. त्या कॉलेजचा ‘कट ऑफ’ तपासणे आवश्‍यक आहे. त्याची ‘रॅंक’देखील तपासली पाहिजे. 
- डॉ. प्रा. शीतलकुमार रवंदळे 

विषयांची वर्गवारी करणे महत्त्वाचे
परीक्षेतील गुण पाहून करिअर निवडू नका. मित्रांचे ऐकून निर्णय घेऊ नका. करिअर निवडण्यासाठी आत्तापर्यंतच्या निकालावरून शिक्षण घेतलेल्या विषयाचे तीन भाग करा. त्यातील आवडणारे विषय, मध्यम विषय आणि अजिबात न आवडणारे विषय, अशी वर्गवारी करा. याबाबत पालकांशीही चर्चा करा. आवडणाऱ्या विषयात कुठे संधी आहे, याची माहिती घेऊन त्यानुसार करिअर निवडा.
विवेक वेलणकर

यंदा ‘विड्रॉल ॲप्लिकेशन’ची सुविधा
राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयातून माहिती पुस्तिका खरेदी करावी. तर सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील माहिती केंद्रातून पुस्तिका घ्यावी. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी शाळाप्रमुखांनी करणे बंधनकारक आहे. यावर्षी ‘विड्रॉल ॲप्लिकेशन’ची सुविधा दिली आहे. त्यामुळे ज्या मुलांना एकावेळी अनेक ठिकाणी अर्ज केला आहे, त्यांचा दुसरीकडे प्रवेश निश्‍चित झाला असल्यास त्यांना बाहेर पडण्याची संधी आहे.
- प्रा. कांचन पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com