क्षमतांचा विचार करून अभ्यासक्रम निवडा - प्रा. विजय नवले

Sakal-Vidya
Sakal-Vidya

पिंपरी - ‘‘करिअरसाठी अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थी आणि पालकांनी एकमेकांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमता, आवड यांचा विचार करून अभ्यासक्रमाची निवड केल्यास नक्कीच यश मिळते,’’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. विजय नवले यांनी रविवारी निगडी येथे केले. 

विविध अभ्यासक्रमांना घ्यावयाच्या प्रवेशप्रक्रियेविषयी ‘सकाळ विद्या,’ ‘पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ व ‘नूतन विद्या प्रसारक मंडळ’ यांच्या वतीने ट्रस्टच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी प्रा. नवले बोलत होते. या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. अनेकांना बसण्यास जाग न मिळाल्याने व्यासपीठावर बसावे लागले. 

प्रा. नवले म्हणाले, ‘‘करिअरविषयी निर्णय घेताना पालकांनी मुलांना त्यांना कोणत्या क्षेत्राची आवड आहे, ते विचारावे. केवळ पैसे मिळतात म्हणून एखाद्या करिअरची निवड करण्यापेक्षा आपण त्या क्षेत्रासाठी योग्य आहोत का, याचा विचार करावा. कोणत्याही करिअरच्या क्षेत्रात चढ-उतार येत असतातच. प्रवेशप्रक्रियेचा अर्ज भरताना विशेष काळजी घ्यावी. ऑप्शन निवडतानाचा प्राधान्यक्रम पूर्ण विचारांती निवडावा. महाविद्यालयाची निवड करताना काही माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधा.’’

प्रा. श्रीधर शन्नाप्पा म्हणाले, ‘‘सतत बदलणाऱ्या अभियांत्रिकी क्षेत्राशी तुम्हाला जुळवून घेता यायला हवे. केवळ माहिती-तंत्रज्ञानात नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत करिअरच्या संधी आहेत.’’ 

प्रा. ललितकुमार वधवा म्हणाले, ‘‘आयआयटीसह अन्य महाविद्यालयांमध्येही अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. आपण कसे शिक्षण घेता, यावर बरेच काही अवलंबून आहे.’’ 

वास्तुरचनाकार अभ्यासक्रमाविषयी वास्तुरचना महाविद्यालयाचे डॉ. महेंद्र सोनवणे म्हणाले, ‘‘ज्यांच्यामध्ये सर्जनशीलता आहे, त्यांनी या वास्तुरचना क्षेत्राच्या करिअरचा विचार करावा. बारावी शास्त्र शाखेनंतर पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. स्वत:च्या व्यवसायासाह विविध कंपन्या, सरकारी खात्यांत नोकरीच्या संधी मिळतात.’’ 

प्रा. मनीषा देशपांडे, प्रा. केतन देसले यांनी प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती दिली. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पात्रता, नियम आदींविषयी माहिती दिली; तसेच सर्वांनी प्रवेशासाठी fe२०१९.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन केले. 

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. सुबोध गलांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com