अरेरे पुण्यात चक्क मुदतबाह्य बाटलीबंद पाण्याची विक्री

Bisleri
Bisleri

पुणे - तुमच्या घरात येणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या जारवर ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’ची (बीएसआय) मोहोर असल्याची खात्री करणे आता पुरेसे नाही, तर तो ‘बीएसआय’चा परवाना वैध आहे का, याची खातरजमाही तुम्हाला करावी लागेल. कारण, परवान्याची वैधता संपल्यानंतरही त्याचा क्रमांक आणि बोधचिन्ह लावून बाटलीबंद पाण्याची सर्रास विक्री होत असल्याचे ‘बीएसआय’ने टाकलेल्या छाप्यातून पुढे आले आहे. 

शहरात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाटलीबंद पाणी वापरले जाते. या पाण्याची विक्री करताना ‘बीएसआय’चा परवाना बंधनकारक आहे. ग्राहकांनी बाटलीबंद पाणी खरेदी करण्यापूर्वी त्यावरचे लेबल पाहावे, असे आवाहन आतापर्यंत करण्यात येत होते. पण, सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी ही काळजी आता पुरेशी नसल्याचे ‘बीएसआय’नेच अधोरेखित केले आहे. त्यांनी दिलेल्या वैध परवान्याची मुदत संपल्यानंतरही तो क्रमांक आणि बोधचिन्ह लेबलवर लावून बाटलीबंद पाण्याची विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. 

याबद्दल ‘बीएसआय’चे प्रमुख संजय कुमार म्हणाले, ‘‘बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासाठी ‘बीएसआय’ची मान्यता बंधनकारक आहे. दिघी येथील राघव बेव्हरेजेस्‌ यांनी घेतलेल्या परवान्याची मुदत संपली होती. त्यानंतर उत्पादन केलेल्या पाण्याच्या जारवर ‘बीएसआय’ क्रमांक छापत होते. ‘बीएसआय’ने टाकलेल्या छाप्यातून हे उघड झाले. वीस लिटर पाण्याच्या जारवर हे लेबल लावून बाटलीबंद पाण्याची विक्री होत असल्याचे दिसून आले. तसेच, ‘बीएसआय’चे बोधचिन्ह आणि क्रमांकासह छापलेले लेबलही तेथे होते. ‘बीएसआय’ची मान्यता असल्याने सामान्य ग्राहक हे पाणी सुरक्षित म्हणून पितो. पण, प्रत्यक्षात त्याला संस्थेने दिलेल्या मान्यतेची मुदत संपली आहे.’’ ‘बीएसआय’चे शास्त्रज्ञ शीतल पाटील म्हणाले, ‘‘दुसऱ्या नावावर उत्पादित होणाऱ्या पाण्यासाठीही ‘बीएसआय’ क्रमांक वापरला आहे.’’ राघव बेव्हरेजेस्‌ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com