रहिवाशांकडून व्यापाऱ्याला रेशन धान्याची विक्री; प्रशासनाकडून गहू, तांदूळ, हरभरा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grains Seized

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट गल्ली नंबर एक या ठिकाणी परिमंडळ अधिकारी खोमणे या तेजस महिला बचत गट या रेशन दुकानाची पाहणी करण्यासाठी गेल्या.

रहिवाशांकडून व्यापाऱ्याला रेशन धान्याची विक्री; प्रशासनाकडून गहू, तांदूळ, हरभरा जप्त

पुणे - रेशनवर दोन-तीन रूपये किलोने मिळालेले धान्य व शालेय पोषण आहारातील हरभरा नागरिकांनी व्यापाऱ्याला विकताना परिमंडल 'क' अधिकारी संगिता खोमणे यांनी पकडला आहे.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट गल्ली नंबर एक या ठिकाणी परिमंडळ अधिकारी खोमणे या तेजस महिला बचत गट या रेशन दुकानाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता, गल्ली नंबर एक मध्ये तीन इसम तराजू व पोती घेवून नागरिकांकडून धान्य विकत घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सबंधित इसमांककडे खोमणे या जात असताना अचानक तिघेही तिथून धावत सुटले. एका तरुणाला पकडण्याचा खोमणे यांनी प्रयत्न केला. परंतु, धक्का देऊन तो पसार झाला. तसेच जप्त करण्यात आलेले धान्य शासकीय गोदामात जमा करण्यात येणार असल्याचे खोमणे यांनी सांगितले.

रेशनचे धान्य विकण्याचा प्रकार शहरातील सर्व झोनमध्ये होतो. रेशन दुकानदार शासकीय नियमाप्रमाणे धान्य देतात. नागरिकांनी त्याचा वापर करायला हवा.शासनाकडून मिळालेलं धान्य बाहेर विकू नये. शासनाकडून मिळालेले धान्य कोण विक्री करत असेल तर १८००२२४९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

- संगीता खोमणे, परिमंडळ अधिकारी 'क'

जप्त करण्यात आलेले धान्य

आठ पोती तांदूळ, एक पोते गहू, जवळपास पंधरा ते वीस किलो शालेय पोषण आहारातील हरभरा.

कोथरूड भागात रेशन दुकानदार रेशनकार्ड धारकांना शासकीय नियमाप्रमाणे धान्य देत नसल्याची तक्रार मनसेच्या वतीने संजय काळे,गणेश शिंदे,सचिन विप्र,बाळा शिंदे यांनी अन्नधान्य पुरवठा विभागाच्या उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, तहसीलदार अपर्णा तांबोळी यांच्याकडे नुकतीच केली आहे.