नवोदित गायकांसाठी ‘अभिजात’! (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मी मूळची मध्य प्रदेशातील; पण कामाच्या निमित्ताने न्यू जर्सीला स्थायिक झाले. ‘अभिजात’साठी निवड झाल्याने अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात एका गाण्याची मूळ गायिका म्हणून नाव मिळाल्याने अभिमान वाटतो. 
- ऋचा जांभेकर

पुणे - गायक व संगीतकार सलील कुलकर्णी नेहमीच संगीतातील नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात. आता त्यांनी जगभरातल्या नवोदित गायकांसाठी ‘अभिजात’ ही आगळीवेगळी संकल्पना ‘फेसबुक’द्वारे मांडली आहे. ‘अभिजात’मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातील गायक सहभागी होऊ शकतात व त्यातील एक गायक त्या गाण्याचा मूळ गायक बनू शकतो.

या संकल्पनेत दिग्गज कवींच्या काही मोजक्‍या कविता संगीतबद्ध करून सलील कुलकर्णी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केल्या जातात. यानंतर काही दिवसांच्या मुदतीत ती चाल आपल्या आवाजात बसवून पुन्हा याच फेसबुक पेजवर जगभरातील गायक ते गाणे अपलोड करतात. अशा ‘ऑडिशन’मधून एका योग्य आवाजाची निवड केली जाते आणि ते मूळ गाणे गाण्याची संधी त्या गायकास मिळते. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या ‘अभिजात’ उपक्रमातील चौथ्या गाण्याचे ध्वनिमुद्रण नुकतेच झाले. यासाठी आवाज निवडला गेला थेट न्यू जर्सी येथे राहणाऱ्या ऋचा जांभेकर यांचा! 

कवी बा. भ. बोरकर यांच्या ‘घन वदन’ या कवितेची मूळ गायिका आता ऋचा जांभेकर असेल. अशाच प्रकारे या आधीच्या गाण्यात जर्मनी, लातूर, अमेरिका, पुणे, नागपूर, मुंबई येथील गायकांच्या आवाजात ‘सूर नवे हे गीत नवे’ गाणे रेकॉर्ड करण्यात आले. तसेच अभिजातमध्ये राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी व देवकी पंडित या गायकांनीही गाणी गायली आहेत. आगामी ‘भीमरूपी महारूद्रा’ हे गाणे बालगायकांसाठी असेल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

मी मूळची मध्य प्रदेशातील; पण कामाच्या निमित्ताने न्यू जर्सीला स्थायिक झाले. ‘अभिजात’साठी निवड झाल्याने अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात एका गाण्याची मूळ गायिका म्हणून नाव मिळाल्याने अभिमान वाटतो. 
- ऋचा जांभेकर

Web Title: salil kulkarni singer abhijat facebook