टीनेजर्समध्ये 'रिलेशनशिप'ची क्रेझ

सलील उरुणकर
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

शाळकरी मुला-मुलींमध्ये "रिलेशनशिप‘चे आकर्षण वाढीस लागले आहे; पण "रिलेशनशिप‘मुळे उद्‌भवणारे कौटुंबिक व सामाजिक प्रश्‍न मुला-मुलींवर दबाव न आणता "मित्रत्वा‘च्या नात्याने पालकांनी सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

बर्गर आणि पिझ्झा यासारख्या खाण्याच्या सवयींमुळे, तसेच अयोग्य व्यायामामुळे मुला-मुलींमध्ये "हार्मोनल‘ बदल होत आहेत. जीवनशैलीतील या बदलांमुळे शारीरिक आजार तर जडत आहेतच; पण न कळत्या वयातील लैंगिक आकर्षणात वाढ होत आहे. त्यामुळे शाळकरी मुला-मुलींमध्ये "रिलेशनशिप‘चे आकर्षणही वाढीस लागले आहे; पण "रिलेशनशिप‘मुळे उद्‌भवणारे कौटुंबिक व सामाजिक प्रश्‍न मुला-मुलींवर दबाव न आणता "मित्रत्वा‘च्या नात्याने पालकांनी सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पुणे - ‘शाळा सुटल्यानंतर "त्या‘ तिघी घरी गेल्या... घरातून बाहेर पडल्यावर एका पूर्वनिश्‍चित ठिकाणी त्या जाऊन थांबल्या... तेवढ्यात बाईकवरून तीन मुले तिथे आली आणि त्या तिघी गाडीवर बसून निघाल्या... गणेशखिंड रस्त्यावरील एका मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट मध्यापर्यंत पाहून ते निघाले...आई पोचायच्या आत घरी पोचले पाहिजे म्हणून...‘‘ 
 

हा प्रसंग काल्पनिक नसून सुशिक्षित आणि सजग असलेल्या अशा एका डॉक्‍टर दांपत्य आणि त्यांच्या सोसायटीतील अन्य दोन कुटुंबीयांसोबत नुकताच घडलेला आहे. आपली मुलगी कोणाच्या तरी बाईकवरून फिरत होती, ही कल्पनाच त्या दोघांना मान्य होत नव्हती आणि जेव्हा त्यांना समजले, तेव्हा तिला कसे बोलायचे आणि रोखायचे हेसुद्धा कळेनासे झाले होते. 
 

बाल्य आणि प्रौढावस्थेतील मधल्या वर्षात म्हणजे पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये वाढलेले "रिलेशनशिप‘चे क्रेझ हे सध्या शहरातील हजारो पालकांसमोरचे मोठे आव्हान आहे. कामानिमित्त सकाळी लवकर घराबाहेर पडलेले पालक उशिरा घरी येणे, तोपर्यंत मुले व मुली घरात एकट्याच असणे, सातत्याने मोबाइलद्वारे इंटरनेट ऍक्‍सेस मिळत असल्यामुळे शाळकरी मुलांच्या व मुलींच्यात "रिलेशनशिप‘ खूपच सहजपणे निर्माण होत आहे. 

अयोग्य आहार आणि व्यायाम कारणीभूत - डॉ. प्रिया देशपांडे 
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे म्हणाल्या, ‘मैदायुक्त विशेषतः "जंक फूड‘ आहार, तसेच जड पदार्थ खाल्ल्यानंतर पुन्हा खाण्यातील अंतर कमी असणे आणि अयोग्य व्यायामामुळे मुलींमधील "टेस्टोस्टेरोन‘ या संप्रेरकाची वाढ होते. त्यामुळे अनेक मुली वरचढ ठरण्यासाठी आक्रमक होतात व त्या सतत ऊर्जितावस्थेत असतात. अशा शरीरांतर्गत बदलांमुळे लैंगिक आकर्षण वाढते. शाळकरी मुला-मुलींमध्ये वाढणाऱ्या या "रिलेशनशिप‘च्या प्रकरणांसाठी पालक आणि शिक्षक समप्रमाणात जबाबदार आहेत. आपल्या मुलां-मुलींचे कोणाबरोबर संबंध आहेत, हे समजल्यावर पालकांनी संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे.‘‘ 

क्‍लिनिकल सायकोलॉजिस्ट वर्षा वर्तक म्हणाल्या, ‘मुला-मुलींमध्ये अपेक्षित वयापेक्षा लवकर येणारी पौगंडावस्था हा बहुतांश पालकांसमोरील मोठा प्रश्‍न आहे. खूपच कमी वयात लैंगिक संबंध ठेवल्यामुळे काय नुकसान होऊ शकते, याची फारशी माहिती मुलांना नसते आणि त्यांना जबाबदारीचे भानही आलेले नसते. नोकरी-व्यवसायामुळे पालकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे बऱ्याच मुला-मुलींना घरातून जो भावनिक आधार मिळणे आवश्‍यक असतो, तोसुद्धा मिळत नाही. त्यातच "वन नाइट स्टॅंड‘चे आकर्षण, मित्र-मैत्रिणींची "रिलेशनशिप‘ पाहून आपणही तेच केले पाहिजे, याचा अप्रत्यक्ष दबाव निर्माण झालेला असतो.‘‘ 

पालकांसाठी... 
- आपला मुलगा किंवा मुलीच्या भावनांचा आदर करा 
- किशोरवयातील मुले सज्ञानासारखी वागण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देण्याची गरज असते 
- निःपक्षपणे बाजू ऐकून घ्या 
- "पालक‘ म्हणून तुमचा निर्णय लादू नका, "मित्र‘ म्हणून पटवून द्या 
- लैंगिकतेची अचूक व प्रामाणिकपणे माहिती द्या 

मुला-मुलींसाठी... 
- पालकांशी बोलायची भीती वाटत असेल, तर समुपदेशकाशी बोला 
- केवळ मित्र किंवा मैत्रीण "रिलेशनशिप‘मध्ये आहे, म्हणून आपणही असलो पाहिजे, हा समज मनातून काढा
- "मैत्री‘पलीकडचे संबंध निर्माण करण्यापूर्वी संबंधित मुला-मुलीची संपूर्ण माहिती घ्या

Web Title: Salil Urunkar writes about craze of relationship among youngsters