'द-बॅंग'ने फेडले डोळ्यांचे पारणे; तारे-तारकांसोबत पुणेकरांचा ठेका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

बालेवाडी-म्हाळुंगे क्रीडा संकुलाच्या मैदानात या तारे-तारकांनी पुणेकर रसिकांना खिळवून ठेवले. सिनेसंगीताच्या दणदणाटी ठेक्‍यांवर डेझी शाह, दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा, भारतीय मायकेल जॅक्‍सन प्रभुदेवा, कतरिना कैफ यांच्या अदांवर तरुणाईने ताल धरला. 

पुणे : बॅंग... बॅंग... द-बॅंग... बॉलिवूडच्या तारे-तारका अवतरल्या... रंगीबेरंगी प्रकाश झळाळला... बॉलिवूडच्या सुरावटींवर ते थिरकले नि या झगमगाटानं पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडून टाकले... 

बालेवाडी-म्हाळुंगे क्रीडा संकुलाच्या मैदानात या तारे-तारकांनी पुणेकर रसिकांना खिळवून ठेवले. सिनेसंगीताच्या दणदणाटी ठेक्‍यांवर डेझी शाह, दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा, भारतीय मायकेल जॅक्‍सन प्रभुदेवा, कतरिना कैफ यांच्या अदांवर तरुणाईने ताल धरला. 

द-बॅंगमधील नृत्य संगीताचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांची पावले दुपारी तीनलाच बालेवाडी-म्हाळुंगेच्या दिशेने वळू लागली होती... बरोबर पावणेसातच्या सुमारास सूत्रसंचालक मनीष पॉल याने रंगमंचाचा ताबा घेतली नि सळसळत्या उत्साहात सुरू झाला द-बॅंगचा मनोहारी जल्लोष... "माशाल्ला माशाल्ला,' "साडी के फॉल सा,' "करूं मैं तुम से गंदी...,' "तनू काला चष्मा,' या गाण्यांवर कलाकारांनी बहारदार नृत्ये सादर केली. 

दोन नृत्यांमधील वेळ साधत मनीष पॉल प्रेक्षकांमध्ये आला. पुणेकरांना त्याने कतरिनाला प्रपोज करायला लावलं, सलमानचा "हम तुम मे इतने छेद करेंगे की...' हा संवाद मराठीतून बोलण्यास सांगितला. त्याच्या या "परीक्षे'चीही लज्जत पुणेकरांना अनुभवली. सोनाक्षीसाठी "लडका' शोधण्याचाही प्रयत्न त्याने केला. याद्वारे त्याने पुणेकरांशी तारकांचा थेट संवाद घडविला. 

रसिकांच्या आवाजाने आसमंत व्यापला 
रात्री आठ वाजता दबंग, सुपरस्टार सलमान खानची एंट्री झाली आणि त्याला साद घालण्यासाठी क्षणार्धात पुणेकर रसिकांच्या आवाजानं आसमंत व्यापला. काही जणांनी उभे राहत, त्याचे मंचावर स्वागत केले. तो येण्यापूर्वी मंच पडद्याने झाकण्यात आला. तो उघडला आणि सलमान एका ट्रॉलीवर स्टेजवर अवतरला. त्याची सर्व नृत्ये प्रेक्षकांनी उभे राहून, गाण्यांवर ठेका धरतच पाहिली. 

पुणेकरांचे बल्ले बल्ले 
गायक गुरू रंधवा याच्या पंजाबी धाटणीच्या गाण्यांना पुुणेकरांना अक्षरश: नाचायला लावले. गोरी नाल इश्‍क, बन जा तू मेरी राणी, तेनू सूड कर दा या गाण्यांवर तरुणाईच नव्हे तर विवाहित जोडप्यांनीही ठेका धरत नाचण्याचा आनंद घेतला. सलमान, कतरिना, सोनाक्षीला कॅमेरात टिपण्यासाठी प्रेक्षक आटोकाट प्रयत्न करताना दिसत होते. तो स्टेजवर येत राहिला आणि सलमान... सलमान... या साद घालणाऱ्या आवाजाच्या लहरी उमटल्या... प्रेक्षकांच्या गर्दीत त्या उमटतच राहिला...

Web Title: Salman Khan Da Bangg tour entertainment programme in Pune