Video : ‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामामधून पुणेकर अन् प्रशासनाला अनोखा ‘सॅल्युट’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

'पुनरागमनाय च - गणेशोत्सव 2020 एक उत्सव मनात राहिलेला' हा माहितीपट पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात भारावलेले वातावरण बघायला मिळते. दरवर्षी जगभरातील गणेशभक्त, पर्यटक गणेशोत्सव अनुभवण्यासाठी शहरात येतात. पण, कोरोनामुळे यंदा हा उत्सव अगदी साधेपणाने झाला. त्यावर 'पुनरागमनाय च - गणेशोत्सव 2020 एक उत्सव मनात राहिलेला' हा माहितीपट पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गणरायांच्या आगमनाचा जल्लोष, आनंद गणेशभक्तांच्या मनात जेवढा असतो, त्याहून अधिक उत्कट भावना श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत दिसतात. यंदाचे वर्ष मात्र, या आनंदोत्सवाच्या 129 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक बाबींसाठी अपवादात्मक होते, ते कोरोना विषाणूच्या संकटामुळे. या काळात अतिशय संयमाने उत्सव साजरा करणार्‍या लाखो पुणेकरांना, डॉक्टर्स, पोलिस व पालिका प्रशासनाच्या अतुलनीय कामगिरीला सलाम या पटातून केला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असलेला हा डॉक्युड्रामा महेश लिमये यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यासाठी पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी त्याचे लेखन केले आहे आणि अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज लाभला आहे. संगीत व पार्श्वगायन केदार भागवत यांचे असून, संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पेज आणि पुणे पोलिसांच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर विनामूल्य पाहता येणार आहे.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

महेश लिमये याबद्दल म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच लाख घरगुती आणि साडेचार ते पाच हजार मंडळांच्या गणपतींचे साध्या पद्धतीने विसर्जन झाले. यामुळे पुणेकरांच्या शिस्तीला ‘सॅल्युट’ आणि प्रशासनाचे आभार मानणारा डॉक्युड्रामा करावा अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली. यंदा पोलिस, पालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला गणेशभक्तांनी उत्तम सपोर्ट केला. यंदाच्या वर्षी बाप्पा एका वेगळ्या प्रकारे अनुभवता आले. हा गणेशोत्सव ‘न भूतो न भविष्यती’ असा वेगळा ठरला, भविष्यात अनेक वर्षांनी हा डॉक्युड्रामा बघितला जाईल, त्यावेळी आजच्या परिस्थितीची जाणीव यातून होईल."

बालन म्हणाले, "आम्ही जनहितार्थ निर्मिती केलेल्या या डॉक्युड्रामाचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करणे हे आव्हान होते. मात्र, पुणेकरांनी अतिशय संयमाने आणि शिस्तीने उत्सव साजरा केला. ऐतिहासिक परंपरा, मनातील भावना याला मुरड घालत पुणेकरांनी प्रशासनाला केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक मध्यवर्ती भागात गणपतीच्या दर्शनाला येतात यंदा मात्र त्यांनी घरी राहूनच ऑनलाईन दर्शन घेतले, प्रशासनाला सहकार्य केले."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salute to punekar and administration from docudrama punaragamanaya cha