धीरोदात्त वीरपत्नींच्या कार्याला सलाम 

धीरोदात्त वीरपत्नींच्या कार्याला सलाम 

पुणे - जम्मू- काश्‍मीरच्या उंच शिखरावरून देशाचे रक्षण करताना लान्स नाईक राजू साळुंके यांना अतिरेक्‍यांची हालचाल दिसली... त्याक्षणी त्यांनी सहकाऱ्यांना सावध केले. रात्रभराच्या गोळीबारात साळुंकेंच्या बंदुकीतील गोळ्यांनी दोन अतिरेकी टिपले... पण त्याचवेळी त्यांच्या हाताला एक गोळी लागल्याने पूर्ण हात कायमस्वरूपी निकामी झाला. अशा परिस्थितीतही त्यांच्या पत्नी सरिता सांळुके यांनी त्यांना खंबीर साथ देत संसाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सरिता साळुंके व त्यांच्यासारख्या धीरोदात्त वीरपत्नींच्या कार्याचा गौरव "क्‍यूएमटीआय' संस्थेने शुक्रवारी केला. 

देशरक्षण करताना जखमी होणाऱ्या जवानांचे पुनर्वसन करणाऱ्या "क्वीन मेरीज्‌ टेक्‍निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स' (क्‍यूएमटीआय) या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त "ऋण- अब हमारी जिम्मेदारी' हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याचा समारोप "ऋण शौर्यगाथा' या कार्यक्रमाने झाला. या वेळी शत्रूशी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांच्या वीरपत्नींना "वीरनारी पुरस्कार' देण्यात आला. "रिडिफाइन कन्सेप्ट्‌स'च्या पुढाकाराने "मराठी- ऋण कलाकार क्रिकेट लीग'ही होत आहे. "सकाळ माध्यम समूह' या सोहळ्यासाठी माध्यम प्रायोजक आहे. या कार्यक्रमात लष्कराच्या दक्षिण विभागाचे मेजर जनरल प्रिथी सिंग, "सकाळ'चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, देवयानी सिंग, "क्‍यूएमटीआय' संस्थेच्या शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल बिंद्रा, "रिडिफाइन कन्सेप्ट्‌स'चे योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात "मराठी- ऋण कलाकार क्रिकेट लीग'च्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. तसेच, अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि सहकाऱ्यांनी नृत्याविष्कारातून, तर अभिनेत्री श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, युवा गायिका कार्तिकी गायकवाड, गायक रोहित राव यांनी देशभक्तिपर गीते व कलाविष्कार सादर केला. 

वीर जवान आणि त्यांना साथ देणाऱ्या "ती'ची ओळख 

* शिपाई दामोदर कुमार - पूनम बेन 
जम्मू- काश्‍मीरमधील सीमारेषेजवळ पेट्रोलिंग करताना शत्रूने केलेल्या बॉंबस्फोटात शिपाई दामोदर सुरेश कुमार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतर आपला एक पाय निकामी झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी कृत्रिम पायाच्या साहाय्याने चालायला सुरवात केली. संगणक प्रशिक्षण घेऊन आता ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांची पत्नी पूनम बेन त्यांना साथ देत आहेत. 

* अनिलकुमार सिंग - शोभा सिंग 
हवालदार अनिलकुमार सिंग अतिरेक्‍यांशी कडवी झुंज देत होते. रात्रभर चाललेल्या गोळीबारात सिंग यांना तीन गोळ्या लागल्या. रुग्णालयात दाखल केल्यापासून ते अनेक दिवस कोमात होते. त्या दिवसांपासून आजपर्यंत अनिलकुमार यांना शोभा सिंग या साथ देत आहेत. 

* राजेंद्र यादव - धरमशीला देवी 
पहारा देण्यासाठी जम्मू- काश्‍मीरच्या शिखरावर चढत असताना हवालदार राजेंद्र यादव यांचा पाय शत्रूने रचलेल्या भूसुरुंगावर पडला. तेथून ते दूर फेकले गेले. उपचारावेळी त्यांना आपण एक पाय गमावल्याचे लक्षात आले. या प्रसंगानंतर खचून न जाता त्यांच्या पत्नी धरमशीला देवी यांनी राजेंद्र यांचे जीवन सुसह्य केले. 

* सोमा म्हस्के- आशा म्हस्के 
नाईक सोमा सुरेश म्हस्के हे भुयारी बंकरमध्ये कार्यरत होते. शत्रूच्या हल्ल्यामुळे जमिनीला जोरदार हादरा बसल्याने बंकरभोवती मोठ-मोठे दगड येऊन आदळले. त्यात काही जवान शहीद झाले. त्याच मोठ्या दगडात अडकलेल्या म्हस्के यांचे प्राण वाचले; पण ते जखमी झाले. अजूनही त्यांच्या जखमा भरल्या नाहीत. त्यांच्या पत्नी आशा म्हस्के त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com